शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांनी अचानक अडवला मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा ताफा.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Jan 08, 2021
चंद्रपूर:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भंडारा जिल्ह्यतील वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला भेट दिली. यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी अचानक मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवल्याची घटना घडली आहे.

उमरेड विधानसभा मतदारसंघातील चाळीस गाव या प्रकल्पामध्ये गेलेली आहेत. पण, अद्यापही त्या गावातील पुनर्वसनाची कामे पूर्ण झालेली नाहीत. वीज पाणी आणि रस्ते यासारख्या मूलभूत सुविधा अद्याप तेथे पोहोचलेल्या नाहीत, असे उमरेडचे आमदार राजू पारवे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या या भेटीदरम्यान अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात आढावा घेऊन निधी तसेच भूसंपादनासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. 

गोसेखुर्द प्रकरणाचे काम ३५ वर्षांपासून सुरू आहे. पण, अद्यापही ते पूर्णत्वास गेले नाही, असा प्रश्न विचारला असता विदर्भातील रखडलेल्या सर्व प्रकल्प, सर्व कामांची पाहणी करणे, तिथल्या लोकांच्या अडचणी समजून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या अडचणी ऐकून घेऊन त्यावर पुढील काळात उपाययोजना करण्याचे काम करणार आहे, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

शेतकऱ्यांनी अडवला ताफा.......

गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी चंद्रपूरला जात असताना जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा अडवला. गेल्या ३५ वर्षांपासून पाणी प्रश्नाला तोंड द्यावं लागत असल्यामुळे हा ताफा अडवण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गाडीच्या बाहेर येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि काम लवकरच पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं.