गडचिरोली:- तालुक्यातील धुंडेशिवणी येथील जंगलात सरपण आणण्यासाठी गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करुन त्यास ठार केल्याची घटना काल सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. दयाराम धर्माजी चुधरी(६७) असे मृत इसमाचे नाव आहे.
दयाराम चुधरी हे काही नागरिकांसह काल सकाळी जंगलात सरपण आणण्यासाठी गेले होते. दरम्यान झुडपात दबा धरुन बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करुन ठार केले. शेजारी असलेल्या दोन जणांनी आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला. पोर्ला येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. वाघाच्या हल्ल्यात मागील दीड महिन्यात गडचिरोली तालुक्यातील तीन जणांचा बळी गेला आहे.