(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- सरपन आणण्याकरीता जंगलात गेलेल्या शेत मजुरावर वाघाने हल्ला करुन ठार केल्याची घटना भद्रावती पोलिस स्टेशन अंतर्गत भद्रावती तालुक्यातील गुळगाव-वडेगाव जंगल शिवारात बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
मोरेश्वर शामराव श्रीरामे(३५) रा. चिचोली (चोरा) असे मृतकाचे नाव आहे.तो शेत मजुरीचे काम करायचा. मंगळवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान स्वयंपाकासाठी सरपन आणण्याकरीता नजिकच्या गुळगाव-वडेगाव जंगलात गेला असता दबा धरुन बसलेल्या वाघाने मोरेश्वरवर हल्ला केला. या हल्ल्यात तो जागीच ठार झाला. रात्र होऊनही मोरेश्वर घरी आला नाही म्हणून त्याचा शोध घेतला असता बुधवारी सकाळी १० वाजता शेजारच्या जंगलात त्याचा मृतदेहच आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच गावक-यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली व त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.मृतकाच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.