Top News

शासकीय आदिवासी व समाजकल्याण वस्तीगृहे तात्काळ सुरू करा, अन्यथा आंदोलन करु:- तुलसीभाऊ अलाम जिल्हाध्यक्ष

अखिल भारतीय गोंडवाना पार्टीचा इशारा.
Bhairav Diwase. Feb 16, 2021
चंद्रपूर:- शासकीय आदिवासी वस्तीगृहे व समाजकल्याण वस्तीगृहे तात्काळ सुरू करा,अशी मागणी तुलसीभाऊ अलाम जिल्हाध्यक्ष चंद्रपूर अखिल भारतीय गोंडवाना पार्टी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा श्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, आदिवासी विकास मंञी अॅड. के. सी. पाडवी साहेब, समाजकल्याण  मंञी श्री. धनंजय मुंडे  व आयुक्त आदिवासी विकास भवन नाशिक यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की,  कोरोना महामारीमुळे मागील 8- 9 महिन्यापासून शाळा व महाविद्यालये बंद होते.त्यामुळे विद्यार्थ्यांना नाईलाजाने घरीच थांबावे लागले. 

      शासनाने मागील  काही दिवसांपूर्वीच शाळा  महाविद्यालये सुरू केलेली आहेत. माञ शासकीय  आदिवासी वस्तीगृहे व समाजकल्याण वस्तीगृहे अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे आदिवासी व मागासवर्गीय  विद्यार्थ्यांचे गैरसोय होऊन हाल होत आहेत. आदिवासी व दुर्गम भागांतून विद्यार्थी शहराच्या ठिकाणी शाळा, काॅलेज, वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, व्यवसायिक शिक्षण इत्यादी विभागात शिक्षण घेत आहेत व काहींनी नवीन प्रवेश घेतलेला आहे. शाळा व महाविद्यालये नियमित सुरू झाल्यामुळे त्यांना नियमितपणे शाळा व महाविद्यालयात जावे लागत आहे. मात्र राहण्याची, जेवणाची, इतर मूलभूत  सुविधा नसल्यामुळे  विद्यार्थी शाळा व महाविद्यालयात जाणे टाळत आहेत.

   गरीब विद्यार्थ्यांना स्वतः चे पैसे खर्च करून राहण्याची व जेवणाची सोय करणे शक्य नाही, त्यामुळे काही विद्यार्थ्यांना नाईलाजाने लांबच्या ठिकाणी शाळा व महाविद्यालयात जाता येत नाही. शिक्षणापासून वंचित राहावे लागत असून शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आदिवासी व मागासवर्गीय  विद्यार्थ्यांची ही गैरसोय लक्षात घेऊन शासकीय आदिवासी वस्तीगृहे व समाजकल्याण वस्तीगृहे तात्काळ सुरू करण्यात यावीत. हीच नम्र विनंती. अन्यथा अखिल भारतीय गोंडवाना पार्टी राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल. याची नोंद घ्यावी. असा आंदोलनाचा इशारा तुलसीभाऊ अलाम जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय गोंडवाना पार्टी चंद्रपूर यांनी प्रशासनाला दिला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने