उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई.
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी करण्यात आली आहे. तरीही तालुक्यातील अनेक ठिकाणी दारूचा अवैध व्यवसाय सुरु असल्याचे वारंवार समोर येत आहे. यासाठी कोणत्या बड्या नेत्याचे आणि अधिकाऱ्याचे आशीर्वाद लाभले आहे का? अशी चर्चा सुरु असताना काँग्रेस नगरसेवक महेश भर्रे च्या घरातून 100 पेटी दारू जप्त करण्यात आली आहे.
ब्रम्हपुरी शहरातील पेठ वार्ड परिसरात असलेल्या घरातून काल रात्री उशिरा दारूसाठा जप्त करण्यात आला. मुंबई येथून चंद्रपुरात आलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष भरारी पथकाने कारवाई केली. काँग्रेसचा हा नगरसेवक गेल्या अनेक महिन्यांपासून दारू तस्करीत सामील असल्याची चर्चा आहे.
दरम्यान,एका वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार,या नगरसेवकावर राजकीय दबावामुळे कारवाई होत नव्हती, पण उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकामुळे कारवाई झाली. महेश भर्रे आणि त्याच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल मात्र हा नगरसेवक कारवाई च्या वेळी घरी उपस्थित नसल्यामुळे त्याला सध्या अटक करण्यात आलेली नाही.
दरम्यान, दारू बंदीच्या काळात दुप्पट रक्कम मोजून मद्यप्रेमी आपले शौक पुर्ण करण्यासाठी गल्लीबोळात फिरताना दिसून येतात. जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे सर्वसामान्य नागरिकांना, महिलांना त्रास होत असल्याने कठोर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.