Top News

वडेट्टीवार यांना दोन हजारांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले

Bhairav Diwase.    March 26, 2021

गोंदिया:- जुगार प्रकरणात न अडकविण्यासाठी व धाडीत पकडलेली दुचाकी सोडण्यासाठी दोन हजार रूपयांची मागणी करून रक्कम स्वीकारणाऱ्या पोलीस हवालदारास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. डुग्गीपार पोलीस ठाण्यातंर्गत कोहमारा चौकात गुरूवारी (दि.२५) ही कारवाई करण्यात आली आहे. संजय उमाजी वडेट्टीवार (४६) असे लाचखोर हवालदाराचे नाव आहे. 

तक्रारदार शेतकरी असून ते ७ मार्च रोजी शेतात किटकनाशक फवारणीसाठी दुचाकी क्रमांक एमएच ३५-एडी ११५३ ने गेले होते. यावेळी डुग्गीपार पोलिसांनी तेथे धाड घालून जुगार खेळणाऱ्यांसोबतच तक्रारदारांचीही दुचाकी उचलून पोलीस ठाण्यात जमा केली होती. यावर तक्रारदाराने बीट अमलदार हवालदार वडेट्टीवार यांना दुचाकी सोड‌ण्यास म्हटले असता त्याने न्यायालयातून सोडवून घे असे म्हटले. त्यानंतर १८ मार्च रोजी तक्रारदाराने वडेट्टीवारला मोबाईलवर संपर्क करून दुचाकीसाठी न्यायालयात अर्ज केल्याचे सांगीतले असता त्याने जुगाराच्या गुन्ह्यात अडकायचे नसल्यास व दुचाकी सोडवायची असल्यास गुपचाप दोन हजार रूपये दे असे म्हटले. तसेच २४ मार्च रोजी वडेट्टीवारने तक्रारदारास मोबाईलवरून संपर्क साधून ठाण्यात ये असे म्हटले. यावर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदविली. तक्रार पडताळणी करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरूवारी (दि.२५) कोहमारा चौकात सापळा लावला. यात वडेट्टीवारने पंचासमक्ष तक्रारदाराकडून दोन हजार रूपयांची लाच घेतली असता पथकाने त्याला रंगेहात पकडले. डुग्गीपार पोलीस ठाण्यात या प्रकरणी लाप्रका १९८८ कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

त्यावरून आरोपीविरूध्द पो.स्टे . डुग्गीपार, जि. गोंदिया येथे अपराध क्र. ६२ / २१.कलम ७ ला . प्र.का. १९८८ ( सुधा.अधि .२०१८ ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कामगिरी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर चे पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलीस अधिक्षक राजेश दुधलवार, मिलींद तोतरे, यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, स.फौ शिवशंकर तुबळे, विजय खोब्रागडे, प्रदिप तुळसकर, ना. पो शि. रंजीत बिसेन, राजेंद्र बिसेन, नितीन रहांगडाले सर्व लाप्रवि. गोंदिया यांनी केली 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने