बनावट पावत्या देवून २५ लाखांची लूट.
पोंभूर्णा निवासी लक्ष्मिकांत नानाजी मेश्राम फरार.
गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.
कोरपना:- महाराष्ट्र बीज बियाणे महामंडळ अकोला मार्फत शेतकर्यांना मिळणार्या योजनेचा लाभ देण्याचे आमिष दाखवून महाबिजच्या नावावर बनावट पावत्या छापून त्याद्वारे कोरपना तालुक्यातील ५० शेतक-यांची सुमारे २५ लाखांनी लुबाडणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. स्वत:ला कंपनीचा अधिकारी सांगून फसवणूक करणारा हा भामटा सध्या पसार झाला आहे. शेतक-यांनी गडचांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, पोंभूर्णा निवासी लक्ष्मिकांत नानाजी मेश्राम याने महाराष्ट्र बीज बियाणे महामंडळ अकोला मार्फत शेतकर्यांना विविध योजनांचे लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखविले. महाबिजच्या नावाने बनावट पोच पावती व योजनेचे फॉर्म छपाई करून त्यावर प्रती शेतकर्यांकडून प्रत्येकी १२ ते १५ हजार अशी रक्कम वसुल केली. कोरपना तालुक्यातील ५० शेतकऱ्यांकडून सुमारे २५ लाखांनी लुबाडणूक केल्याचा धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
महाराष्ट्र बीज बियाणे महामंडळ अकोला महाराष्ट्र शासन नावाच्या पावत्या देऊन पैसे घेतल्याने सदर इसमाशी संपर्क साधला परंतु त्याचा होवू शकला नाही. त्याचेकडून प्राप्त झालेल्या मोबाईल वरही संंपर्क केला. पण त्याचा मोबाईल लागत नसल्याने आणि आपली फसगत झाल्यासारखी स्थिती निर्माण झाल्याने काही शेतकऱ्यांनी मूल येथील महाराष्ट्र बीज बियाणे महामंडळ कार्यालयात जावून चौकशी केली. त्यावेळी सदर व्यक्ती या ठिकाणी कार्यरत नसल्याचे सांगण्यात आले. या माहितीने शेतक-यांना धक्काच बसला. शेतक-यांनी सांगितलेल्या नावाचा कंपनीकडे कार्यरत नाही शिवाय आम्ही त्याला ओळखत नसल्याचे मूल येथील अधिका-यांनी सागितल्याने फसवत झाल्याचे लक्षात आले. अस्मानी आणि सूल्तानी संकटामुळे शेतकर्यांची परिस्थिति हलाखीची असताना महाबिज कंपनीच्या नावाने पैसै लुबाडणूक झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
कोरपना तालुक्यातील ५० शेतकऱ्यांची फसवणूक करणार्या भामट्याला शोधून कायदेशीर कारवाई करून शेतकर्यांना न्याय द्यावा अशी पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.