विद्यार्थी पोलिस स्टेशनमध्ये देताहेत ऑनलाइन परीक्षा.

Bhairav Diwase
0
Bhairav Diwase.    March 14, 2021
भामरागड:- सध्या विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा सुरू असून अनेक ठिकाणी नेटवर्कची समस्या विद्यार्थ्यांना भेडसावत आहे. मात्र, लाहेरीसारख्या अतिदुर्गम भागांत जिथे नागरिकांना मोबाईल नेटवर्क शोधूनही सापडत नाही तिथे पोलिस मदतीला आले असून थेट पोलिस स्टेशनमध्ये तेथील नेटवर्कचा वापर करून विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची सोय पोलिस विभागाने केली आहे. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांची खूप मोठी समस्या सुटली आहे.

आदिवासीबहुल व अतिदुर्गम गडचिरोली जिल्हा शैक्षणिक दृष्टीने मागासलेला असतानाच जगभर थैमान घातलेल्या कोरोना महामारीने शैक्षणिक क्षेत्रही ठप्प झाले. परिणामी विद्यार्थ्यांचे शाळा, महाविद्यालयात जाऊन पारंपरिक पद्धतीने ज्ञानार्जन करणे व परीक्षेच्या माध्यमातून ते उत्तरपत्रिकेमध्ये उतरवून स्वतःची गुणवत्ता सिद्ध करणे यावरही मर्यादा आल्या. उपाय म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अनवधानाने का होईना सुरू करून विसाव्या शतकाच्या आठव्या दशकापासून सुरू असलेल्या पारंपरिक शिक्षण पद्धतीस फाटा देण्याचे धारिष्ट्य शासनाने दाखवले. याचे फायदे तोटे यांच्यावर चर्चा हा व्यापक विषय काहीवेळ बाजूला ठेवल्यास हे एक प्रागतिक पाऊल म्हणावे लागेल.

हे तंत्रज्ञान म्हणजे आंतरजालाचा वापर करून घरबसल्या परीक्षा देणे होय. त्यामुळे काहीअंशी का होईना कोरोनाचा समुदाय फैलाव रोखण्यात शिक्षण विभाग यशस्वी ठरले. परंतु याच वेळी एक अतिशय प्राथमिक उणीव दिसून येते ती म्हणजे घरबसल्या इंटरनेटचा वापर करून परीक्षा देण्यासाठी आवश्‍यक असणारी अनुपलब्धता व वारंवार होणारा खंडित वीजपुरवठा याचा सर्वाधिक फटका गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागातील लाहेरीसारख्या परिसरास बसतो. परिणामी शिक्षण व्यवस्थेबाबत आधीच तोकडी जागरूकता असलेल्या या भागात शिक्षणाबद्दल निरसता निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

दुसरीकडे पोलिस स्टेशन म्हटले की तक्रारदार, साक्षीदार, पोलिस, आरोपी व त्यासंबंधीची दस्त लेखन असेच काहीसे चित्र आपल्या समोर उभे राहते. परंतु उप पोलिस स्टेशन लाहेरी येथे एक अनोखेच चित्र बघायला मिळत आहे. इथे परिसरातील विद्यार्थ्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती व लाहेरी पोलिसांची दृढ कर्तव्यनिष्ठा व सामाजिक बांधिलकीच्या सुरेख समन्वयातून विद्यार्थी चक्क उप पोलिस स्टेशन येथे येऊन ऑनलाइन परीक्षा देत आहेत.

पोलिसांकडून मदतीचा हात.....

पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक समीर शेख, सोमय मुंढे, उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनात लाहेरीचे प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर व इतर अधिकारी, अंमलदार यांच्या पुढाकारातून पोलिस विभागाने विद्यार्थ्यांना हा मदतीचा हात दिला आहे. परिक्षार्थींसाठी स्वतंत्र खोली व नेटवर्कची सुविधा पोलिसदादा लोरा योजनेतून पुरवण्यात आली आहे. याचा फायदा या परिसरातील नागपूर येथे सेंट्रल प्रॉव्हिनसिल स्कुलमध्ये दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा झाला. त्यांनी इंग्रजीचा पेपर ऑनलाइन दिली असून बाकी आठ विषयांची परीक्षाही ते इथेच बसून देणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)