‘सोनू तुला वीजबिल भरायचं नाय का?’ असं म्हणत वीजबिल भरण्यासाठीचे सगळे प्रयोग करुन झाल्यानंतर आता महावितरणने गाण्याच्या माध्यमातून थकबाकीदारांना साद घालण्यात येत आहे. लॉकडाऊन काळातील वीजबिल भरण्यासाठी सगळे प्रयत्न करुन झाल्यावर महावितरणने अनोखा फंडा अवलंबला आहे. आता थकित बिलं भरण्यासाठी थेट गाण्याच्याच माध्यमातून थकबाकीदारांना आवाहन केलं जात आहे.
सोनू आहे राजाची शान; सोनूला गावात मान!
सोनूचा मोबाईल भारी, सोनूची गाडी लय भारी…
सोनू आमचा ग्राहक लाडका,
आम्ही त्याला वीज देतो बरका,
सोनूची कॉलर टाईट, बिल भरायले वाटते वाईट,
सोनू तुला वीज बिल भरायचे नाही का?
सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय काय?' या धम्माल गीताच्या चालीवर महावितरणने हे गीत तयार केले आहे. नाशिक परिमंडळात घरगुती आणि वाणिज्यिक तसेच कृषी पंप धारकांकडे कोट्यवधींची थकबाकी आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना वीज बिल भरण्याला प्रवृत्त करण्यासाठी गीताचा आधार घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या संकट काळापासून अडचणीत आलेल्या महावितरणपुढे वीज बिल वसुलीचे संकट आहे. वीज बिलाची वसुली आणि सूट हा मुद्दा आता राजकीय इच्छाशक्तीचा झाल्याने महावितरणपुढेही अडचणी निर्माण झालेल्या आहेत. असे असले तरी प्रत्येक परिमंडळाने आपल्या ग्राहकांनी वीज बिल भरावे यासाठीचे प्रयत्न चालविले आहेत. त्यातच नाशिक परिमडळाने ग्राहकांना वीज बिल भरण्याचे आवाहन केले आहे. गीताच्या माध्यमातून त्यांनी ग्राहकांना घातलेली साद लक्ष वेधून घेत आहे.