Top News

"गो-बॅक अमित देशमुख"

आधी कोविड योध्द्यांचे पगार द्या, मगच जिल्ह्यात या.
Bhairav Diwase. April 26, 2021
चंद्रपूर:- कोरोनाच्या पहिल्या लाटेत ७ महिने विनावेतन रुग्णसेवा केली. थकीत पगारासाठी मागील ७८ दिवसांपासून मुलं-बाळ व कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डेरा आंदोलन सुरू केले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या बेकायदेशीर कृत्या विरोधात कामगार विभागाने सुद्धा फौजदारी खटले दाखल केले. परंतु राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला जाग आलेली नाही. दर महिन्याला नियमीत पगार मिळणे कायद्यानुसार कामगारांचा हक्क असताना अधिकाऱ्यांच्या भोंगळ व भ्रष्ट कारभारामुळे कामगारांना पगार मिळू शकले नाही. या विभागाचे सचिव सौरभ विजय, संचालक डॉ. तात्याराव लहाने,चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सर्व अधिकारी शासनाची दिशाभूल करीत आहेत.

वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री अमित देशमुख कोविड योद्ध्यांच्या उपासमारीशी काहीही घेणे-देणे नसल्यासारखे वागत आहेत. अधिकाऱ्यांवर त्यांचा वचक राहिलेला नाही.थकीत पगारामुळे दोन कामगारांचा मृत्यू झालेला असतानाही कामगारांना थकीत पगार मिळत नसेल,तर या विभागाच्या मंत्र्यांना चंद्रपूर जिल्ह्यात येण्याचा हक्क नाही. मंत्री अमित देशमुख यांनी आधी कोविड योध्द्यांचे थकीत पगार द्यावे आणि नंतरच चंद्रपूर जिल्ह्यातील पाय ठेवावा.अन्यथा त्यांना जिल्ह्यातील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिलेला आहे.

कोरोना आपत्तीला एक वर्ष पूर्ण झाले. या अवधीत चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे तीन तेरा वाजले. अधिष्‍ठाता यांच्या भ्रष्ट व भोंगळ कारभारामुळे जनतेमध्ये मोठा रोष आहे.वर्षभरामध्ये देशमुख यांनी राज्यातील एकाही वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भेट दिल्याचे माहितीस आलेले नाही.एक वर्षानंतर अमित देशमुख कोरोना आपत्तीचा वर्धापन दिवस साजरा करण्यासाठी राज्याचा किंवा चंद्रपूर जिल्ह्याचा दौऱ्यावर निघाले का? की कोरोनामुळे नाहक बळी गेलेल्या नागरिकांच्या मृत्यूंचे उत्सव साजरे करण्यासाठी ते चंद्रपूर जिल्ह्यात येत आहेत? असा संतप्त सवाल नगरसेवक देशमुख यांनी उपस्थित केलेला आहे.

राज्यातील कोरोना आपत्तीचा सामना करण्यासाठी राजेश टोपे आरोग्य व्यवस्थेची धुरा समर्थपणे सांभाळताना जनतेला वारंवार दिसून आले. मात्र वैद्यकीय महाविद्यालयांशी जोडलेले राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त रुग्णालय हे राजेश टोपे यांच्या विभागाअंतर्गत येत नाहीत. या रुग्णालयांवर टोपेंच्या सार्वजनिक आरोग्य खात्याचे नियंत्रण नाही. वैद्यकीय महाविद्यालयाशी जोडलेल्या सर्व रुग्णालयांवर अमित देशमुख यांच्या खात्याचे नियंत्रण आहे. मात्र वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या भोंगळ व भ्रष्ट कारभारामुळे राज्यातील अर्ध्यापेक्षा जास्त आरोग्य व्यवस्था मोडकळीस आलेली आहे. विलासराव देशमुख यांचे नाव सोबत जोडलेले असल्यामुळे अमित देशमुख यांचे विरुद्ध बोलणे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांना सुद्धा परवडणारे नाही. त्यामुळे राज्यातील जनतेचे नाहक बळी जात असताना अमित देशमुख यांचे खाते बदलण्याचे किंवा त्यांचा राजीनामा घेण्याचे धाडस कोणी करत नाही असा जनविकास सेनेचा आरोप आहे. जनविकासचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी काल घेतलेल्या फेसबुक लाईव्ह मधून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने अमित देशमुख यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुद्धा केलेली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने