Top News

लाखो रुपये लंपास केलेल्या चोरट्याला अटक; चाचणी करताच पॉझिटिव्ह आला अन् उडाली खळबळ.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
वरोरा:- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 20 मार्चला चोरट्यांनी चोरी करून लाखो रुपये लंपास केले होते. त्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्यांपैकी एक चोरटा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन खळबळ उडाली आहे.

टेमुर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने लोखंडी खिडकीचे गज तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी सहा लाख 88 हजार रुपये रोख आणि चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले होते.

या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने केला. उत्तरप्रदेश, गोंदिया आणि पडोली येथून काही चोरट्यांना अटक केली. आजघडीला त्यातील तीन आरोपी वरोरा पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांच्याकडून आणखी मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता लक्षात घेता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली होती. या आरोपींना न्यायालयात हजर करण्याआधी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात एक चोरटा कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांनी दिली. अन्य दोघांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. पॉझिटिव्ह चोरट्याला सध्या विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने