छत्तीसगड:- कोब्रा कमांडो दलाचे जवान राकेश्वर सिंह मनहास शनिवारी छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यापासून बेपत्ता आहेत. बेपत्ता कमांडो नक्षलवाद्यांच्या ताब्यात असल्याची शक्यता आहे. बेपत्ता कमांडो आपल्या ताब्यात आहे, असा दावा नक्षलवाद्यांनी केल्याचं समजतंय. नक्षलवाद्यांनी पत्रकारांशी बोलताना हा दावा केला आहे. त्यांनी फोनवर सांगितलं की, ते जवानाला कोणतेही नुकसान पोहोचवणार नाहीत. पण, त्याच्या सुटकेसाठी नक्षलवाद्यांनी एक अट ठेवली आहे. बेपत्ता झालेला जवानाचे नाव राजेश्वर सिंग मनहास असं आहे. तो जम्मू-काश्मीरचा रहिवाशी असून कोब्रा टीमचा कमांडो आहे. नक्षलवाद्यांनी पत्रकारांना फोन करुन अट ठेवलीये की, ते राजेश्वर सिंहला सोडण्यासाठी तयार आहेत, पण त्यांना वचन द्यावं लागेल की, ते सुरक्षा दलाच्या सेवेतून मुक्त होतील आणि नोकरी सोडल्यानंतर ते दुसरं काम करतील.
'फ्री प्रेस जर्नल'च्या वृत्तानुसार, नक्षलवाद्यांनी सोमवारी दोन स्थानिक पत्रकारांना फोन करुन बेपत्ता कमांडो आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे. बिजापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश मिश्रा आणि पत्रकार राजा राठोड यांना फोन करुन नक्षलवाद्यांनी बेपत्ता जवान आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला. याबाबत बिजापूरचे पोलिस अधीक्षक कामलोचन कश्यप यांनी सुरूवातीला माध्यमांशी बोलताना नक्षलवाद्यांकडून फोन आल्याच्या वृत्ताचं खंडन केलं, पण नंतर पत्रकारांना फोन आल्याचं सांगितल्यावर त्यांनी, "हो जवान नक्षलवाद्यांच्या ताब्यात असू शकतो कारण सुरक्षा दलाने घटनेनंतर जवळच्या पाच-सहा किलोमीटरच्या परीसरात त्याचा बराच शोध घेतला होता पण त्यांना यश आलं नाही" अशी प्रतिक्रिया दिली. "जवानाला शोधण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत, आम्ही फोन कॉल्सचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत", अशी माहिती एसपी कश्यप यांनी दिली आहे.