जिल्हा प्रशासनाकडून रेमडेसिवीर इंजेक्शन मिळण्याची प्रक्रिया जाहीर....

Bhairav Diwase

अशी असेल प्रक्रिया.

Bhairav Diwase. April 25, 2021

चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्हयासाठी प्राप्त झालेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचे रूग्णालय निहाय वाटप करण्यात आलेले असून रेमडेसिवीर इंजेक्शन मिळण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली आहे.

अशी असेल प्रक्रिया......

मुख्य उत्पादकाकडून, वितरक व स्टॉकिस्टकडे इंजेक्शन प्राप्त होतात. याबद्दलची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे स्थानिक अधिकारी यांना प्राप्त होते. अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांचेकडून जिल्हात कार्यरत कोविड रुग्णालये, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल यामध्ये भरती रुग्णांच्या आधारे रुग्णालय निहाय समप्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शन वाटपाचे वर्गीकरण करून ते जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात येते.

जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे वर्गीकरण तपासून मान्यता देण्यात येते व मान्यतेप्रमाणे इंजेक्शन संबंधित रुग्णालयांच्या औषध विक्रेत्याकडे वर्ग करण्यास आदेशित करण्यात येते.

कोविड रुग्णालयांच्या डॉक्टरांद्वारे त्यांच्या रुग्णालयात भरती रुग्णांची तपासणी करून ज्या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता आहे त्यांना क्रमाने इंजेक्शन बद्दलचे प्रिस्क्रिप्शन देऊन सदर प्रिस्क्रिप्शन आधारे त्या रुग्णालयास संलग्न औषध वितरकाकडे इंजेक्शन प्राप्त करून घेण्यासाठी पाठविण्यात येते.

औषध वितरकाने ज्याप्रमाणे डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन दिले आहे त्याच क्रमाने प्रिस्क्रिप्शन धारकास इंजेक्शन देण्यात येते. औषध वितरकांने इंजेक्शन देण्याबद्दलची व रुग्णांची सविस्तर नोंद "परिशिष्ट अ" मध्ये घ्यावी. तसेच औषधी वितरकाने शासनाने निर्धारित करून दिलेले दर आकारावे.

औषधी वितरकाने रुग्णांचा तपशील दररोज सायंकाळी 8.30 वाजता अन्न व औषध प्रशासन विभागास सादर करावा. प्राप्त यादीतील तपशिलाची तपासणी व पडताळणी नियंत्रण कक्षाद्वारे केली जाईल. यासाठी ठराविक रुग्ण व त्यांचे नातेवाईकांशी संपर्क साधला जाईल व खात्री केली जाईल.

यासाठी जिल्हा नियंत्रण कक्ष 07172-274161, 07172-274162 संपर्क क्रमांक कार्यान्वीत करण्यात आलेले आहे.