Top News

विहिरीत पडून दोन अस्वल, दोन पिल्लांचा मृत्यू.

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- उन्हाची तीव्रता वाढत असताना वन्यप्राणी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करताना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बफर झोन अंतर्गत एका कठडे नसलेल्या विहिरीत पडून दोन अस्वल व दोन पिल्लांचा बुडून करुण अंत झाला. सदर घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

दुर्गापूर उपक्षेत्रातील पायली भटाळी नियतक्षेत्रात वढोली येथील कटारिया व टिपले यांच्या खासगी शेतातील कठडे नसलेल्या विहिरीत अंदाजे पाच ते सहा वर्षे वयाची मादी व नर अस्वल आणि त्यांचे दोन पिल्ले अंदाजे वय एक वर्ष ते सहा महिने यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आले.

या घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर वन विभागाच्या विभागीय वन अधिकारी एस.व्ही. जगताप पथकासह घटनास्थळी पोहचल्या. यावेळी त्यांना दोन मोठय़ा अस्वलांसह त्यांची दोन पिल्ले कठडे नसलेल्या विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याचे दिसले. आज शेतात काही लोक गेले असताना त्यांना हे दृश्य नजरेस पडले.

ताडोबातून पाण्यासाठी नेहमीच प्राणी बाहेर पडतात. पाण्याच्या शोधात फिरत असतानाच ही घटना घडल्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान, मृत अस्वलाच्या कुटुंबाला विहिरीबाहेर काढून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कडूकर, डॉ. कुंदन पोडचेलवार यांनी शवविच्छेदन केले. मुख्य वनसंरक्षक एन.आर. प्रवीण यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी अस्वलाचे कुटुंब विहिरीत पडले असावे. विहिरीला कठडे नसल्यामुळे ही दुर्घटना घडली, असे त्यांचे म्हणणे आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने