Top News

चक्क डॉक्टरने लपवला रेमडेसिव्हिरचा साठा.

Bhairav Diwase. April 20, 2021
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- मृत्यूशी झुंज देणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी आवश्‍यक ‘रेमडेसिव्हिर’चा साठा वैद्यकीय महाविद्यालयातील एका डॉक्‍टरने परस्पर लपवून ठेवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. अधिकाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला आणि तब्बल चोवीस तासांनी हे बिंग फुटले. काळ्याबाजारात विकण्यासाठी ‘रेमडेसिव्हिर’ लपविण्यात आले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी आणि संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहे.


चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अतिदक्षता आणि सामान्य वॉर्ड मिळून 240 खाटांची व्यवस्था आहे. या प्रत्येक खाटावर रुग्ण आहे. कोरोनावर सध्यातरी कोणतेही ठोस उपचार नाही. परंतु ‘रेमडेसिव्हिर’ घेतलेले रुग्ण उपचाराला प्रतिसाद देतात, असे दिसून आले. त्यामुळे या इंजेक्‍शनच्या मागणीने प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. काळ्याबाजारात तीस -चाळीस हजार रुपयांपर्यंत ते विकले जाते.

या इंजेक्‍शनसाठी नातेवाईक अक्षरशः वणवण फिरत असतात. येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील कोरोनाबाधितांसाठी 25 एप्रिल रोजी 138 रेमडेसिव्हिर प्रशासनाने पाठविले. तिथल्या डॉक्‍टरांनी रुग्णांना याची गरज असल्याचे ‘प्रिस्क्रिप्शन’दिले होते. तत्पूर्वी रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिव्हिरच्या शोधात होते.

याच दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी यातील अनेकांनी संपर्क केला. 25 एप्रिलला इंजेक्‍शन मिळतील, असे कर्डिले यांनी सांगितले. त्यामुळे यादिवशी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक रेमडेसिव्हिरची चातकाप्रमाणे वाट बघत होते. परंतु 24 तासांचा कालावधी उलटल्यानंतरसुद्धा इंजेक्‍शन मिळाले नाही.

याकाळात रुग्णालयात दाखल अनेक कोरोना रुग्णांची प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे जवळपास पन्नास नातेवाईकांनी त्यांच्याशी पुन्हा संपर्क केला. त्यांनी रुग्णालयात संबंधितांकडे विचारणा केली. तेव्हा वॉर्ड क्रमांक -8 मध्ये ती इंजेक्‍शन दिली, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र, त्या वॉर्डातसुद्धा इंजेक्‍शन मिळाले नव्हते. त्यामुळे कर्डिले यांनाही धक्काच बसला.

या वॉर्डाच्या प्रमुखांनी आपला भ्रमणध्वनी बंद केला आणि घरी निघून गेले होते. त्यामुळे 26 एप्रिलला रात्री अकरा वाजताच्या सुमाराला कर्डिले रुग्णालयात पोहोचले. त्यांनी तिथे उपस्थित परिचारिकेला रेमडेसिव्हिरबाबत विचारणा केली. तेव्हा ते कपाटात कुलूप बंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकाराने कर्डिले संतप्त झाले.

त्यांनी तेव्हा इंजेक्‍शन बाहेर काढली. रुग्णांना द्यायला लावली. तेव्हा रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला. रेमडेसिव्हिरचा साठा 24 तासापर्यंत कुलूप बंद ठेवण्याचे कारण कुणीच सांगू शकले नाही. कर्डिले यांनीसुद्धा यावर भाष्य करणे टाळले. काही अडचण असल्यास रुग्णांच्या नातेवाईकांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे ते म्हणाले. प्रचंड मागणी असलेल्या या इंजेक्‍शनची काळ्याबाजारात विक्री होते. कुलूप बंद रेमडेसिव्हिर त्याचसाठी ठेवली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.


गुल्हाने संतप्त, हुमने बेफिकीर......

इंजेक्‍शन उपलब्ध असतानाही 24 तासांपर्यंत कुलूप बंद ठेवण्याचे प्रकरण बुधवारी झालेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीत समोर आले. त्यानंतर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी संबंधितांवर कारवाईचे निर्देश दिले. परंतु कारवाईचे अधिकार असलेले वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हुमने याबाबत कमालीचे बेफीकीर असल्याचे दिसून येत आहे. इंजेक्‍शन मिळाले आता कारवाई नाही, असे त्यांनी सांगितले. परंतु 24 तासापर्यंत रेमडेसिव्हिर कुलूप बंद का? याबाबत ते बोलायला तयार नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने