Top News

"चंद्रपूरसाठी काळा दिवस, दारूबंदी अयशस्वी की मंत्री-शासन अपयशी?"

पद्मश्री बंग दाम्पत्याचा ठाकरे सरकारला सवाल.
Bhairav Diwase. May 28, 2021
चंद्रपूर:- राज्यातील महाविकास आघाडी सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. गडचिरोली, चंद्रपूर भागात आदिवासींच्या आरोग्यावर काम करणाऱ्या पद्मश्री डॉ. अभय बंग आणि डॉ.राणी बंग यांनी हा चंद्रपूरसाठी काळा दिवस असल्याचं मत व्यक्त केलं. तसेच हे दारुबंदीचं अपयशी आहे की मंत्री-शासन असा प्रश्नही उपस्थित केलाय. दारूबंदी उठवण्याचा राज्य सरकारचा निर्णय अयोग्य आणि दुर्दैवी असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
डॉ. अभय बंग म्हणाले, “जिल्ह्यातील 1 लाख महिलांचे आंदोलन, 585 ग्रामपंचायती व जिल्हापरिषदांचा ठराव यामुळे शासनाने 6 वर्षांपूर्वी दारूबंदीचा निर्णय घेतला होता. त्या दारूबंदीची अंमलबजावणी पुरेसी झाली नाही हे अगदी खरं आहे. पण सरकारच्या कोणत्या योजनेची आणि कायद्याची अंमलबजावणी 100 टक्के होते? मग या सर्व योजना-कायदे रद्द करणार का? शासनाला कोरोना नियंत्रण नीट करता येत नाही. म्हणून कोरोना नियंत्रणाचं कामही थांबवणार का?”

“दारूबंदीची अंमलबजावणी गडचिरोली, बिहारमध्ये होते, मग चंद्रपुरात का नाही?”

“अंमलबजावणी नीट होत नाही तर नीट करा! त्यासाठीच शासन आहे, मंत्री आहेत. दारूबंदीची अंमलबजावणी शेजारच्या गडचिरोली जिल्ह्यात चांगली होते, बिहारमध्ये चांगली होते, मग चंद्रपुरात का करता येत नाही? की ती करायचीच नाही? चंद्रपूरची दारूबंदी उठवण्याची मागणी स्वत: पालकमंत्र्यांनी घोषित करून मग त्याचे समर्थन करण्यासाठी शासकीय समितीचा फार्स केला. आता शासनाचा निर्णय करवून घेतलाय,” असं डॉ. बंग यांनी सांगितलं.

“दारूबंदी उठविणे ही अपयशी शासनाची कबुली”

डॉ. अभय बंग म्हणाले, “जिल्ह्यात 1000 कोटी रुपयांची अधिकृत आणि 500 कोटींची अनधिकृत दारू दरवर्षी विकली जाईल. 1500 कोटींचे दारू-सम्राट निर्माण होतील. राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यातली प्रभावी दारूबंदी, बिहारमधील दारूबंदी यापासून शिकून चंद्रपूरमध्ये देखील यशस्वी दारू नियंत्रण करायला हवे. दारूबंदी उठविणे ही अपयशी शासनाची कबुली आहे. दु:ख एवढेच की या अपयशातून जिल्ह्यात दारू साम्राज्य व स्त्रियांच्या दु:खाचा सागर जन्माला येईल.”

“अजित पवारांनी चंद्रपूरच्या दारुचा कर नको सांगितलं, मग हा पैसा कुणाला हवाय?”

“सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी दारुबंदी हटवायची असल्याचाही दावा केला जातो. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार मला व्यक्तीशः म्हणाले की सरकार चालवायला, अर्थसंकल्प करायला मला चंद्रपूरच्या दारुच्या कराची गरज नाही. त्यामुळे सरकारच्या या तर्कात अर्थ नाही,” असंही डॉ. बंग यांनी नमूद केलं.


पद्मश्री बंग दाम्पत्याचे सरकारला काही सवाल

जिल्ह्यातील 4 लाख पुरुष दारू पितील, 1500 कोटी रुपये त्यावर उडवतील. त्यांच्या कुटुंबांचे काय होणार?

जवळपास 80,000 व्यसनी निर्माण होतील. त्याला जबाबदार कोण? त्यांची व्यवस्था काय?

स्त्रियांवर अत्याचार, गुन्हे, बलात्कार, मारपीट हे प्रचंड प्रमाणात वाढतील. त्यासाठी जबाबदार कोण ?

दारूबंदी असलेल्या शेजारच्या गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात चंद्रपूरमधील दारू आयात होईल. ती कोण व कशी थांबवणार ?

“चंद्रपूरच्या इतिहासातील हा अत्यंत काळा दिवस”

डॉ. राणी बंग म्हणाल्या, “चंद्रपूरच्या इतिहासातील हा अत्यंत काळा दिवस आहे. पालकमंत्री आपल्या भावी पीढिच्या रक्षणासाठी असतात. मात्र, चंद्रपूरचे पालकमंत्री निवडून आल्यापासून दारुबंदी उठवण्याच्या कार्यक्रमाचा घोषा लावत होते. जणुकाही दारुबंदी उठवण्याच्या एकमेव कामासाठी ते निवडून आले होते. अर्थात त्यांनी त्यांचा शब्द खरा करुन दाखवला आहे. मात्र, मंत्रिमंडळाने हीच तत्परता कोरोनाचं नियंत्रणासाठी खर्ची घातली असती तर अधिक चांगलं झालं असतं.”

“दारुबंदीसाठी अनवाणी पायांनी 100 किलोमीटर चालणाऱ्या महिलांचा आवाज दबला”

“चंद्रपूरची दारुबंदी अपयशी नाही, तर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात शासन अपयशी झालंय. 70-100 किलोमीटर दूरहून महिला अनवाणी पायांनी नागपूरपर्यंत आल्या. त्या काही उगाच आल्या नाही. त्या महिलांचा आवाज पूर्णपणे दबला गेलाय. त्यामुळे या निर्णयाविरोधात निषेध व्यक्त करणं चंद्रपूरकरांची जबाबदारी आहे. मी चंद्रपूरच्या सर्व महिलांना आवाहन करते की आपण जननी आहोत. आपण नवीन जीवाला जन्म देतो. आपल्यासमोर आपली मुलं दारु पिऊन उद्ध्वस्त होतील हे कुठल्याही आईला बघावं वाटणार नाही. म्हणूनच महिलांनी चंद्रपूरमध्ये दारुबंदीची ही क्रांती घडवून आणली होती. पण त्यावर आज पाणी फेरलंय. म्हणूनच महिलांनी पुन्हा खंबीरपणे समोर यायला हवं,” असं राणी बंग यांनी नमूद केलं.

“WHO दारुचे दुष्परिणाम सांगत असताना ठाकरे सरकारने असा निर्णय कसा घेतला?”

चंद्रपूरमधील दारूबंदी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या अॅड. पारोमिता गोस्वामी म्हणाल्या, “चंद्रपूरची दारुबंदी उठवण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. कोरोना काळात दारूचे सेवन करू नये, असं जागतिक आरोग्य संघटना सांगत आहे. असं असताना मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूरमधील दारुबंदी हटवण्याचा हा निर्णय घेणं अतिशय चुकीचं आहे. हा निर्णय घेताना चंद्रपूरमध्ये दारुबंदी होण्यासाठी काम करणाऱ्या महिला संघटना किंवा कोणत्याही महिलांशी साधी चर्चाही करण्यात आली नाही. त्यामुळं हा निर्णय म्हणजे या जिल्ह्यातील महिलांचा अपमान आहे. या निर्णयाचा मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुनर्विचार करावा आणि योग्य अंमलबजावणी करून दारुबंदी कायम ठेवावी.”

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने