चंद्रपुर:- चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली अवैध दारूविक्री आणि गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने १ एप्रिल २०१५ रोजी लागू केलेली दारूबंदी उठविण्यास डॉ. अभय बंग यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकत्र्यांनी, महिला व नागरिकांनी आणि मंत्रिमंडळ बैठकीत काही मंत्र्यांनीही विरोध केला. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर भाजपाकडून याचा विरोध केला जात आहे. असं असतानाच भाजपाचे माळशिरचे आमदार राम सातपुते यांनीही ट्विटरवरुन ठाकरे सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना खोचक शब्दात टीका केलीय.
राम सातपुते यांनी सरकार निर्णयासंदर्भातील माहिती देणारं कार्ड पोस्ट करत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. "दारुबंदी उठवून गुन्हेगारी कमी होईल असा जावई शोध या ठाकरे सरकारने लावला आहे. येत्या काळात रेशनिंग दुकानावर दारू वाटायला पण हे सरकार मागे पुढे पहाणार नाही," असं ट्विट सातपुते यांनी केलं आहे. तसेच त्यांनी ठाकरे सरकारचा कारभारावर भाष्य करताना, अंधेर नगरी चौपट राजा असा उल्लेख केलाय.
यांचा होता दारुबंदी उठवण्यास विरोध...
तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमध्ये दारूबंदी लागू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. अनेक ग्रामपंचायती, महिला संघटना, बचतगट आदींनी दारूबंदीसाठी ठराव केले होते. दारूच्या व्यसनामुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त होत होते, तरुण पिढीही दारूच्या आहारी जात होती. त्यामुळे डॉ. बंग, पारोमिता गोस्वामी यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी दारूबंदीसाठी प्रयत्न केले होते आणि बंदी उठविण्यास ठाम विरोध केला होता.
फडणवीस आणि मुनगंटीवार यांनीही व्यक्त केली नाराजी.
चंद्रपुरातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचे दूरमागी परिणामी होतील, असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. चंद्रपूरमधील दारूबंदी ही तेथील शेकडो ग्रामपंचायतींनी केलेले ठराव, हजारो महिलांचा मोर्चा ही लोकभावना लक्षात घेऊन के ली होती. अवैध दारूविक्री व त्याबाबतचे गुन्हे वाढत असल्याने दारूबंदी रद्द करत असल्याचे सांगत महाविकास आघाडी सरकारने आपल्या अकार्यक्षमतेची कबुलीच दिली आहे, असे चंद्रपूरचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.