भद्रावती पोलिसांनी कारवाईचा फास आवळला.

Bhairav Diwase
बाजारपेठेतील दोन दिवसांच्या कारवाईत ३७ हजाराचा दंड वसूल.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- शहरातील लॉकडाऊनच्या उतरार्धात शिथिल झालेल्या कारवाईचा फास आवळत सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर वर्मा यांच्या नेतृत्वात भद्रावती पोलिसांनी शहरातील बाजारपेठेत वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करीत लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या व्यापारी तथा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करुन दि.२२ व २३ मे या दोन दिवसात ३७,५०० रुपयांचा दंड ठोठावला.
अचानक सुरू झालेल्या या पोलीसी कारवाईमुळे शहरातील व्यापारी व नागरिकांमध्ये चांगलीच धडकी भरली असून शहरात विनाकारण मोटारसायकलने भटकणाऱ्या विशेत: युवा बाईकस्वारांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक व्यापारी व नगरीक लॉकडाऊनच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करतांना दिसत होते. या काळात पोलीस कारवाईत शिथिलता आल्यामुळे व्यापारी व नागरिक बिनधास्तपणे लॉकडाऊनचे नियम मोडतांना दिसत होते. सकाळी ७ ते ११ पर्यंतची दुकानांची वेळ असतांना दुकाने जास्त वेळेपर्यंत उघडी ठेवली जात होती.
 याशिवाय जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता इतर व्यावसायिकांनीही आपली दुकाने उघडणे सुरू केले होते. त्यामुळे बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढली होती.शेवटी भद्रावती पोलिसांनी शहरातील बाजारपेठेत कारवाई करीत १२ दुकानांवर प्रत्येकी २,००० रुपये असे २४ हजार, १९ विनामॉस्क फिरणाऱ्या नागरिकांवर प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे ९,५०० रुपये, तर मोटार वाहन कायद्या अंतर्गत २० वाहन चालकांवर कारवाई करीत ४ हजार रुपये असा दोन दिवसात एकूण ३७,५०० रुपयांचा दंड वसूल केला.
सदर कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक मुळे, विक्की परतेपी, जगदिश शेंद्रे आदी पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.