Click Here...👇👇👇

कोरोना रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार खाजगी रुग्णालयाला ठोकले सील.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चामोर्शी:- तालुक्यातील तळोधीवरून २ कि.मी. अंतरावर असलेल्या हिवरगाव या गावात डॉ. अतुल सुरजागडे हे आपल्या घरी दवाखाना उघडून रुग्ण तपासणी करायचे. डॉ. सुरजागडे हे भाडभिडी(मो.) येथे शासकीय सेवेत आहेत. हिवरगाव येथील बंडू बारसगडे यांचा गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात कोरोनाने मृत्यू झाला. ग्रामस्तरीय समितीचा पंचनामा व मयताच्या पत्नीच्या जबाबावरून तहसीलदार यांच्या नेतृत्वात मोका पंचनामा करून हे क्लिनिक बंद करण्यात आले आहे.

मृतकाच्या पत्नी निरंजना बारसागडे यांनी सांगितले की, काही दिवसांपासून माझे पती आजारी होते. त्यांना डॉ. सुरजागडे यांच्याकडे दि.१ मे रोजी उपचारासाठी नेलेे. डॉ. सुरजागडे यांनी रुग्णाची एक्स-रे काढून रक्त तपासणीही करावी लागेल, त्यानंतर मी उपचार करणार असे सांगितले. त्यानंतर गडचिरोली येथील डॉ. साळवे यांच्याकडे एक्स-रे काढले. याबरोबरच डॉ. सुरजागडे यांनी क्लिनिकमधील लॅबमध्येच रक्त तपासणी केली. रुग्णाला न्यूमोनिया आहे असे सांगितले. त्यानंतर उपचाराला सुरुवात केली. मात्र, उपचार करूनही रुग्णाच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. उलट ऑक्सिजन लेव्हल फार कमी झाले होते. त्यामुळे सुरजागडे यांनी ऑक्सिजनची व्यवस्था करा, मी रुग्णाला बरं करणार असे सांगितले. मात्र, आमच्याकडून ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था न झाल्याने डॉक्टरनेच ऑक्सिजनची व्यवस्था केली व त्यासाठी ५० हजार रुपये लागतील असे सांगितले.

३ तारखेला ऑक्सिजन लावला. मात्र, काही वेळानंतर ऑक्सिजन संपले. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांनी त्यांना गडचिरोली येथे घेऊन जाण्यासाठी परवानगी मागितली. दुसऱ्या दिवशी रुग्णाला सामान्य रुग्णालयात दाखल केले असता कोरोना चाचणीत कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. कोरोनामुळे उपचारादरम्यान ५ मे राेजी दुपारी रुग्णाचा मृत्यू झाला.

बंडू बारसगडे यांची तब्येत नाजूक असतानाही शिवाय ऑक्सिजनची आवश्यकता असताना देखील त्यांनी सामान्य रुग्णालयात पाठवण्याचे सांगितले नाही. उलट आमच्याकडून २० हजार रुपये रक्कम घेतली. डॉ. सुरजागडे यांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या पतीचा जीव गेला,असे सांगितले.

दि. ६ मे रोजी दुपारी २ वाजता डॉ. सुरजागडे यांच्या खासगी क्लिनिकमध्ये गाव कृती समितीने भेट देऊन चाौकशी करून मोका पंचनामा तयार केला.

दि.७ मे रोजी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण लायबर, प्रभारी गटविकास अधिकारी डाॅ. सागर डुकरे, सरपंच गौराबाई गावडे, पंचायत समिती सभापती भाऊराव डोर्लीकर, पोलीस पाटील, तलाठी यांच्या उपस्थितीत तालुका आरोग्य अधिकारी यांनी क्लिनिकला सील केले. पुढील तपास करून डॉ. सुरजागडे यांच्यावर कार्यवाही करू, असे यावेळी समितीने सांगितले.