पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

Bhairav Diwase
तेंदू पत्ता तोडायला गेली होती जंगलात


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती,दि.१९(तालुका प्रतिनिधी)
तेंदू पत्ता तोडण्याकरीता नजीकच्या जंगलात गेलेल्या महिलेवर पट्टेदार वाघाने हल्ला करुन ठार करण्याची घटना दि.१९ मे रोजी सकाळी ८.३० वाजता भद्रावती तालुक्यातील आयुध निर्माणी जंगल परिसरात घडली.
प्राप्त माहितीनुसार,सध्या ग्रामीण भागात तेंदू पत्ता आणि फळे गोळा करण्याकरीता ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात जवळच्या जंगलात जातात. 
 त्याचप्रमाणे भद्रावती तालुक्यातील घोट (निंबाळा) येथील रजनी भालेराव चिकराम (३५) ही महिला बुधवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास गावाच्या जवळ असलेल्या आयुध निर्माणी जंगल परिसरात तेंदू पत्ते तोडण्याकरीता गेली. दरम्यान, तेंदू पत्ते तोडत असताना झुडुपात दबा धरुन बसलेल्या पट्टेदार वाघाने तिच्यावर हल्ला केला.त्यात ती जागीच ठार झाली. 
या घटनेची गावक-यांना माहिती होताच वनविभाग आणि पोलिस विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करुन प्रेत शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आले. पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. मृतक महिलेच्या पश्चात पती, मुलगा व मुलगी असा आप्त परिवार आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मृतकाच्या नातेवाईकांनी केली आहे.