२२ हजाराच्या गांजासह ८२ हजाराचा मुद्देमाल जप्त.
भद्रावती पोलिसांची टप्पा चौकात कारवाई.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- वरोऱ्यावरून भद्रावती मार्गे चंद्रपूरकडे एका काळ्या रंगाच्या मोटार सायकल गाडीतून गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्या एका युवकास व युवतीस पकडण्यास भद्रावती पोलीसांनी यश आले आहे.
सदर कारवाई भद्रावती पोलीसांनी दि.२८ जून रोजी शहरातील बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारासमोरील टप्पा चौकात केली असून सदर युवक तथा युवतीस ताब्यात घेतले आहे. या कारवाईत २२,५०० रुपयांच्या गांजासहित ८२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शक्कर बावली गिरड ता.समुद्रपूर जि. वर्धा येथील साजिद शेख रफीक शेख वय ३१ वर्ष हा युवक व रुक्सार शेख युसूफ शेख वय २१ वर्ष ही युवती मोटार सायकल गाडी क्रमांक एम.एच.३१ ए.यु. ७७६३ या गाडीने भद्रावती मार्गे चंद्रपूरकडे गांजा वाहतूक करीत होती. त्यानुसार भद्रावती पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने येथील टप्पा चौकात नाकाबंदी करून सदर गाडीची झडती घेतली असता स्कुलबॅगमध्ये २२ हजार ५०० रुपये किंमतीचा २२५५ ग्रॅम गांजा आढळून आला. यात मोटार सायकल किंमत ५०,००० रुपये, स्कुलबॅग किंमत २०० रुपये व इतर साहित्ये १५० रुपये असा एकूण ८२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई भद्रावती पोलीसांकडून करण्यात आली. #Cannabissmugglers