Top News

खेळता खेळता बालक पडला बोअरवेलमध्ये.The child fell into the borewell while playing.


"देव तारी त्याला कोण मारी" या म्हणीचा प्रत्यय.
Bhairav Diwase.      June 10, 2021
नागपूर:- थरकाप उडवणारी घटना रामटेक तालुक्यातील शिवणी भोंडकी येथे (ता. ९) घडली. शिवारात खेळताना दोन वर्षांचे चिमुकले बाळ बोअरवेलमध्ये पडला. घटना ऐकताच सगळ्यांनी श्‍वास रोखले. पुढे काय होणार, बालक सुखरूप बाहेर निघावे, इवल्याशा जिवाचे काही बरेवाईट होऊ नये, यासाठी परिसरात सुरू झाल्यात दुवा व प्रार्थना. परंतु, प्रसंगावधान साधून गावकऱ्यांनी बाळास मोठ्या शिताफीने सुखरूप बाहेर काढले. बाळाला पाहिल्यानंतर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.
चिमुकल्याचे नाव नवघान देवा दोंडा (वय २) असे आहे. नवघानचे वडील गुराखी असून, ते शिवारात जनावरे चारत होते. त्यांच्यापासून काही अंतरावर छोटीछोटी मुले खेळत-बागडत होती. खेळता खेळता शेतातील एका बोअरवेलच्या खड्ड्यात चिमुकला नवघान पडला. त्यामुळे इतर मुले रडायला लागली. मुलांचा रडण्याचा आवाज ऐकून वडील धावपळ करीत घटनास्थळी पोचले. हे दृश्‍य पाहून आई-वडिलांनी तर हंबरडाच फोडला.
त्यांचा आक्रोश ऐकून गावातील लोक घटनास्थळी दाखल झाले. जवळपास अर्धा तासापासून ते बाळ बोअरवेलच्या खड्ड्यात अडकले होते. गावातील रक्षक क्रिष्णा पाटील, यादोराव शेंडे, शंकर शेंडे, महादेव पाटील, अमोल वैद्य, अक्षय गभणे ही मंडळी लगबगीने घटनास्थळावर पोहोचली. बोअरवेलला पाणी न लागल्याने शेतकऱ्याने तो खड्डा तसाच उघडा ठेवला होता. बाळास बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. कोणीतरी ‘टॉर्च’ लावून बाळाशी संपर्क साधला. एखाद्या बॉलिवूड चित्रपटातील स्टंटचे दृश्य पहावे, असा तो प्रसंग होता.
पन्नास फूट खोलवर असलेल्या बोअरवेलच्या खड्ड्यात दोर टाकला. बाळास दोर पकडण्याच्या सूचना देण्यात आल्या. अखेर मोठ्या शिताफीने बाळास सुखरूप बाहेर काढण्यात आले. अर्धा तास शर्थीचे प्रयत्न चालले. गावकऱ्यांनी मोठ्या हिमतीने प्रसंगाला तोंड दिले. बोलावलेले जेसीबी येण्यास उशीर झाला. अखेर मोठ्या हिमतीने बाळास सुखरूप बाहेर काढण्यास यश आलेले पाहून गावकऱ्यांनी सुटकेचा श्‍वास सोडला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने