(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चिमूर:- निसर्गाचे सौंदर्य लाभलेले मुक्ताई पर्यटनस्थळ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्याचा निर्णय चॅरिटेबल ट्रस्टने घेतल्याने यावेळी मुक्ताई धबधबा पर्यटकांविनाच कोसळणार आहे. शंकरपूरपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेले मुक्ताई हे पर्यटनस्थळ विदर्भात प्रसिद्ध झालेले आहे. या स्थळाचे विशेष आकर्षण म्हणजे ५५ फुटांवरून कोसळणारा धबधबा पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहे.
मागील दहा वर्षांपासून येथे पावसाळ्यामध्ये हजारो पर्यटक भेट देत असतात. निसर्गाच्या कुशीत बसलेले हे पर्यटनस्थळ जंगलाची हिरवीगार पालवी, पक्ष्यांचा चिवचिवाट, वन्यप्राण्यांच्या पाऊलखुणा आणि पाण्याचा खळखळाट पर्यटकांना येथे भुरळ घालत आहे. याशिवाय माना समाजाचे आराध्य दैवत असलेले मुक्ताई मंदिरसुद्धा येथे प्रसिद्ध आहे. या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी सुद्धा हजारो पर्यटक येथे येतच असतात.
पावसाळ्यात ४५ फुटावरून कोसळणारा धबधब्याच्या धारा अंगावर घेऊन आंनद लुटायला शनिवार व रविवार या सुट्यांच्या दिवसात मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यात तरुणांची संख्या सर्वाधिक होती. चिमूर मुख्यालयापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुक्ताई मंदीर परिसरातील निसर्ग सौंदर्य आणि पावसाळ्यात ५५ फुटावरून कोसळणारा धबधब्याचे आकर्षण विदर्भातील निसर्गप्रेमींना आहे. या परिसरात कोरोना महामारीमुळे मागील पावसाळ्यात बंदी घालण्यात आली होती. यावर्षी मात्र राज्यात डेल्टा प्लस चे रुग्ण आढळल्याने राज्य सरकारने नविन नियमावली जाहीर केली. मात्र शनिवारी आणि रविवारी कोरोनाची सर्व नियम धाब्यावर बसवून हजारो हौशी निसर्गप्रेमी धबधब्याचा आणि निसर्ग सौंदर्याचा आंनद लुटताना दिसत होते.
पण मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला होता. यावर्षी नेमके पर्यटक येण्यास सुरुवात झाली होती. परंतु पुन्हा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आणि त्यानुसार मुक्ताई मंदिरसुद्धा बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता ५५ फुटावरून कोसळणाऱ्या मुक्ताई धबधब्याचे सौंदर्य बघण्यासाठी मात्र पर्यटकांना पुढच्या वर्षीची प्रतीक्षा करावी लागणार, असे चित्र दिसत आहे.
शासनाच्या आदेशानुसार सोमवारपासून मुक्ताई पर्यटन स्थळ बंद करण्यात आले असून पर्यटकांनी शासनाच्या पुढील आदेशापर्यंत या ठिकाणी येऊ नये असे आवाहन रामराव नन्नावरे अध्यक्ष विरांगना मुक्ताई ट्रस्ट डोमा यांनी केले आहे.