Top News

चंद्रपूरातील गोंधळी जात पंचायतीला दणका.


बहिष्कार प्रकरणात 6 जणांना अटक.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- जातपंचायतीच्या जाचामुळे 7 बहिणींना आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याची वेळ आल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर शहरात काही दिवसांपूर्वी घडली होती. चंद्रपूर शहरातील भंगाराम वॉर्ड येथील या प्रकाराबाबत गोंधळी जातपंचायतीच्या 7 पैकी 6 प्रमुखांना आता अटक करण्यात आली आहे.
येथी प्रकाश ओगले यांचं 6 जून रोजी दीर्घ आजारानं निधन झालं. प्रकाश ओगले यांच्या मृत्यूचा निरोप नातलगांना देण्यात आला. मात्र, काही तासातच गेल्या 15 वर्षांपासून प्रकाश ओगले भोगत असलेला जात पंचायतीचा बहिष्कार पुन्हा एकदा आड आला होता.
या पंचायतीनं नातेवाईकांना त्यांच्या अंत्यसंस्काराला जावू नये अन्यथा जात बहिष्कृत करण्याची धमकी दिली होती. त्यामुळं त्यांच्या 7 मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला खांदा देवून अंत्यसंस्कार केले होते.
याबाबत प्रकाश ओगले यांच्या मुलाच्या तक्रारीवरून चंद्रपूर शहरातील शहर पोलीस स्टेशनमध्ये सामाजिक बहिष्कार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. त्यावर आता कारवाई करत पोलिसांनी सुरेश वैराडकर (नागपूर), विनोद वैराडकर (नागपूर), सुरेश गंगावणे (यवतमाळ), प्रेम गंगावणे (यवतमाळ), मोहन ओगले (यवतमाळ), आणि कैलास वैराडकर (रायपूर, छत्तीसगढ) यांना अटक केली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे अशोक गंगावणे (बिलासपूर, छत्तीसगड) याची अटक टळली, आरोपींना उद्या चंद्रपूर न्यायालयापुढे सादर केले जाणार आहे.
गोंधळी समाजाच्या प्रकाश ओगले यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची...पदरी 7 मुली आणि 2 मुलं..त्यामुळे त्यांना समाजातील समारंभ, लग्न ,कार्यक्रम यांना जाणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. आर्थिक दंड लावला, मात्र प्रकाश ओगले यांनी दंड भरला नाही आणि हा बहिष्कार त्यांच्या मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतर ही कायम राहिला. मात्र MPSC ची तयारी करणाऱ्या त्यांच्या जयश्री या मुलीने जात पंचायतीला सणसणीत चपराक लगावत, आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याचा निर्णय घेतला होता.
गोंधळी समाजाच्या जात पंचायतीच्या या जाचाविरूद्ध काही सामाजिक कार्यकर्ते लढा देत आहेत. त्यांच्या मते समाजातील गरिबांकडून पैसे लुबाडने, बहिष्कार टाकणे आणि त्यामाध्यमातून संपूर्ण समाजावर आपली दहशत बसविण्याचं काम जात पंचायत करते. सध्या विदर्भात ३५ कुटुंबं अशा प्रकारचा जात पंचायतीचा बहिष्कार बोगत असल्याची बाब या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे आणली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने