(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- तालुक्यातील नांदा येथील प्रभू रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल रामचंद्र मुसळे यांनी कुठलीही शासन परवानगी न घेता, शिवधुर्याची जागा न सोडता व कुठलीही शासकीय मोजणी न करता अतिक्रमण करून संरक्षण भिंत व सिमेंट काँक्रीटचे पोल उभे करून काटेरी तार लावण्याचे काम सुरु केले आहे. तातडीने हे काम थांबवून कारवाई करण्याची मागणी बिबी ग्रामपंचायतचे सदस्य नरेंद्र अल्ली यांनी तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांच्यासह नांदा बिबी ग्रामपंचायतीकडे केली आहे.
तसेच नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलविल्याने भर वस्तीत पावसाळ्याचे पाणी शिरते. नांदा शेत शिवारातील जेनेकर यांची शेतजमीन जवळपास १५ वर्षांपूर्वी मुसळे यांनी विकत घेतली होती. मुसळे यांनी ही शेतजमीन घेण्यापूर्वी याच शेत जमिनीतील जवळपास २ एकर जमीन जेनेकर यांनी गुंठे पाडून परिसरातील नागरिकांना विकली. आजमितीला त्याठिकाणी जवळपास ६० कुटुंबांनी आपले पक्के घर बनवून वास्तव्य करीत आहे. जेनेकर यांचे शेतामधून नैसर्गिक नाला आहे. परिसरातील पावसाचे व इतर पाणी याच नाल्यांमधून वाहत जाते. काही दिवसांपूर्वी मुसळे यांनी खरेदी केलेल्या जमिनीला संरक्षण भिंतीचे काम सुरू केले आहे. तसेच नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलविला आहे. यासाठी शासनाची कुठलीही बांधकाम परवानगी घेतली नाही.
मुसळे यांची शेतजमीन ही बिबी गावच्या सीमेलगत असून शिवधुर्याची जागा न सोडताच काम करीत असल्याचे दिसून येते. मुसळे यांनी खरेदी केलेल्या शेतजमिनीतील काही शेतजमीन अकृषक वापरात आहे. जेनेकर यांनी गुंठेवारी करून विकलेली जमीन अकृषक वापरात असून त्याठिकाणी मोठी वस्ती उभी आहे. मुसळे यांच्या शेतजमिनीतील काही जमिन अकृषक वापरात आहे या ठिकाणचे सांडपाणी, पावसाचे पाणी, आवाजाहीचे रस्ते व इतर सोयीसुविधांकरिता मुसळे यांच्याद्वारे करण्यात येत असलेल्या पक्क्या बांधकामामुळे मोठी अडचण निर्माण होणार आहे. तसेच शिवधुर्याची जागा सोडली नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. काम तातडीने थांबवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र अल्ली यांनी केली आहे.
बिबी ग्रामपंचायतचे सर्व स्ट्रीट लाइट व बोरवेल सुद्धा तार कंपाऊंडच्या आत घेतली आहे. कोणत्याही प्रकारे मोजणी न करता अरेरावीने काम सुरू असल्यामुळे हे काम तात्काळ थांबविणे आवश्यक आहे.
नरेंद्र अल्ली,
सदस्य ग्रा.पं. बिबी.
सन २००५ रोजी ती शेती मी जेनेकर यांचेकडून विकत घेतली होती आणि सर्व व्यवहार शासन नियमानुसार झाले होते. त्या ठिकाणी कॉन्व्हेट होते पण कोरना महामारी मुळे कॉन्व्हेट बंद झाले आहे त्यामुळे त्या जमीनीवर सोयाबीनची पेरनी केली आहे त्यामुळे मी जमीनीवर तारेचे कुंपन केले आहे म्हणुन जर त्यांनी तहसिलदार यांच्याकडे तक्रार केली आहे हे अतिक्रमण आहे की नाही हे मोजमापं कळेल जर मी केलेल्या कुंपनामध्येच्या जागेत जर त्यांची जागा आली तर मी जागा परत करणार मात्र माझी जागा तिकडे निघाल्या परत घेणार.
अनिल रामचंद्र मुसळे
प्राचार्य,
प्रभुरामचंद्र कनिष्ठ विद्यालय नांदा.
#korpana #Encroachment #korpanaencroachment #chandrapur