Top News

जादूटोणा प्रकरणी आणखी १० जणांना अटक. #Arrested



आतापर्यंत २३ जणांना झाली अटक.

गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त.
जिवती:- जादूटोणा संशय मारहाण प्रकरणी काही लोकांनी वृद्ध महिला व पुरुष याना दोरखंडाने बांधून मारहाण केल्याप्रकरणी काल आणखी १० जनाला अटक करण्यात आली. सोमवार पर्यंत १३ जनाला अटक करण्यात आली होती त्यापैकी ०४ जनाला पोलीस कोठडी तर ०९ ला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. #Arrested
सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी,गडचांदूर यांच्या मार्गदर्शनात संतोष अंबिके, सहा पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन जिवती यांनी पथक तयार करून १० जणांना पुन्हा ताब्यात घेतले त्या आरोपीमध्ये शशिकांत उर्फ किरण चंद्रमनी कराळे वय २५, साहेबराव सटवाजी पौळ वय ३५, मनोहर परशुराम भिसे वय ४५ , केशव श्रीहरी कांबळे वय ३०, दिनेश अंकुश सोनकांबळे वय २३, दत्ता धोंडीराम तेलंगे वय ३५ , भागवत गोपाळ तेलंगे वय ३४, विठ्ठल किसन पांचाळ वय ३७, वैजनाथ संभाजी शिंदे वय ५५, विठ्ठल जगनाथ शिंदे वय ३५ यांचा समावेश आहे.
सर्वावर जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली तसेच न्यायालयात हजर करण्यात आले असून वरील सर्वाना २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.या घटनेत आतापर्यंत २३ जनाला अटक करण्यात आली आहे. जिवती तालुक्यातील वणी खुर्द या गावाला सध्या पोलिसांचा चोख बंदोबस्त असून परिस्थिती शांत व नियंत्रणात आहे.जखमी वृद्ध महिला व पुरुष यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. त्या सर्वांची प्रकृती सध्या चांगली आहे. #Adharnewsnetwork
जिवती तालुक्यातील वणी खुर्द येथे घडलेल्या घटनेची त्वरित दखल घेऊन अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ची पूर्ण चमू व पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी देऊन अतिशय तणावाच्या वातावरणात आणि कडक पोलीस बंदोबस्तात प्रबोधन सभा घेण्यात आली. सभेत जादूटोणा ,करणी ,भूत, भानामती आदी विषयांवर चमत्कार भंडाफोड प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. गावात जादूटोणाविरोधी कायद्याची पत्रके वाटली तसेच चित्र प्रदर्शनी लावण्यात आली. देवी अंगात आणून ज्यांनी नावे घेतली त्या चारही स्त्रिया एकापाठोपाठ एक सभा संपल्याबरोबर अंगात देवी आली म्हणून रडू लागल्या, किंचाळू लागल्या, जमिनीवर लोळू लागल्या, चौकशीमध्ये त्या स्त्रिया अमावस्या-पौर्णिमेला देवी अंगात आणून गावातील शांतता भंग करतात अशी माहिती मिळाली . त्या महिलांना मानसिक रोग तज्ञाकडे कडे उपचारासाठी नेण्याचे निर्देश दिले व पोलिसांनी त्यांना उपचारासाठी भरती केले असून उपचार सुरू आहेत जखमींवर सुद्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची भेट घेऊन त्यांना मानसिक आधार दिला व न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
सदर घटनेसारखी परिसरात पुनरावृत्ती होऊ नये. अशा घटना का घडतात त्यामागील मनोसामाजीक कारणे व उपायासह अनिल दहागावकर, जिल्हा संघटक,अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समिती, धनंजय तावाडे,जिल्हा सचिव, अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी गावकऱ्यासोबत संवाद साधला.आणि जादूटोणा, भानामती, करणी, भूत या अस्तित्वहीन बाबी असून अशा अंधश्रद्धा व मांत्रिकाच्या प्रभावात न येता गावातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याचे आवाहन केले. सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनीही खुळचट अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन कायदा हातात न घेता विवेकबुद्धीने शांततामय जिवन जगण्याचे आवाहन गावकऱ्याना केले.
आमदार सुभाष धोटे यांची त्या गावाला भेट.....

जादूटोणा संशय प्रकरणी मारहाण झाली या घटनेचे गांभीर्य पाहून या क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी वणी खुर्द या गावाला भेट देऊन गावकऱ्यांशी व पीडित कुटुंबियांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. अंधश्रद्धेच्या बळी पडून महिला व पुरुषांना मारहाण करणाऱ्या वर पोलिसांनी योग्य ती कारवाही करावी मात्र निर्दोष लोकांना यामध्ये गोवू नये व गावकऱ्यांनी कुठल्याही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये, गावात शांतता ठेवण्यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन आमदार सुभाष धोटे यांनी केले.
अटकेच्या भीतीपोटी अनेकांनी सोडले गाव.....

जादूटोणा संशय प्रकरणी वृद्ध महिला व पुरुष यांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या लोकांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे त्यात आतापर्यंत २३ जणांना अटक करण्यात आली आहे. अजूनही तपास सुरू आहे यात सहभागी लोकांना अटक करण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासात आपली नावे समोर येतील व अटक करतील या भीतीपोटी अनेकांनी घर सोडल्याची माहिती समोर आली असून काही नागरिक शेतात, जंगलात झोपत असल्याची माहिती गावकरी सांगत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने