(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- स्वातंत्र्य दिनी झेंडावंदनाचा मान सामान्यपणे त्या गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीला किंवा संस्था किंवा आस्थापना प्रमुखाला दिला जातो. परंतु भद्रावती तालुक्यातील सागरा या गावातील झेंडावंदनाचा मान एका सामान्य गृहिणीला देण्यात आला. #Bhadrawati
प्राप्त माहितीनुसार, यंदाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनी अभिनव उपक्रम राबविण्याचा सागरा ग्राम पंचायतीने ठरविले. त्यामध्ये सर्वानुमते १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२१ पर्यंत ज्या नागरिकांनी ग्राम पंचायतीकडे गृहकर भरला, त्यांच्या नावाची ईश्वर चिठ्ठी काढून त्यांच्या घरातील गृहिणीला झेंडा फडकविण्याचा मान द्यायचा असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ईश्वर चिठ्ठी टाकली असता ती ज्ञानेश्वर बांदुरकर यांच्या नावाची निघाली. त्यामुळे त्यांच्या अर्धांगिनी त्रिवेणी ज्ञानेश्वर बांदुरकर यांना झेंडावंदनाचा मान मिळाला. त्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.तसेच याप्रसंगी त्यांचा साडी-चोळी देऊन सत्कार करण्यात आला. #Adharnewsnetwork
तसेच सागरा गावातील बाहेर गावी शिक्षण घेण्याकरिता जाणार्या विद्यार्थ्यांना स्कुल बस ची सोय उपलब्ध करून देण्यात येईल आणि सागरा गावातील दारू आणि अवैध तंबाकू विक्री बंद करण्यासाठी गावकर्यांनी सहकार्य करावे असे याप्रसंगी सरपंच शंकर रासेकर यांनी आवाहन केले. त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले. महिलांना सॅनिटर पॅड वाटप करण्यात आले. शिवाय ज्यांनी चालू वर्षातील टॅक्स भरलेला आहे त्यांना डस्टबीन वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला सरपंच शंकर रासेकर, विठ्ठल पिदुरकर, दिनेश आसुटकर, प्रतीक्षा काकडे, शारदा पांगुळ, अर्चना वाग्दरकर, सोनु टोंगे, गावातील माजी पंचायत समिती सदस्य टिकाराम येवले, पुंजाराम वाग्दरकर, खुशाल मस्के, तलाठी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.