चंद्रपूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा! #Chandrapur #Beating

Bhairav Diwase
"भानामती"च्या संशयावरून महिला, वृध्दांना भरचौकात मारहाण.
जिवती:- जिवती येथून १२ किमी अंतरावर दुर्गम भागात असलेल्या वणी खुर्द या गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी महिला, वयोवृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण केली. या घटनेत ७ जण जखमी झाले असून पाच गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. #Chandrapur #Beating
अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला कलंकित करणारी ही घटना शनिवारी घडली. पोलिसांनी काही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी घटनेबाबत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात येत आहे. त्यामुळे चोवीस तास उलटूनही या गंभीर प्रकाराची कुठेही वाच्यता झाली नाही. किती लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला, कुणाला अटक करण्यात आली का, याबाबत काहीही माहिती देण्यास स्थानिक पोलिसांनी नकार दिला. #Adharnewsnetwork
गावाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला गावात प्रवेश करण्यास मज्जाव केला जात आहे. गावातील लोक काहीही बोलण्यास तयार नाहीत. मात्र, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गावातील दोन-तीन महिलांच्या अंगात देवी आल्या आणि त्यांनी दलित समाजातील वयाने ज्येष्ठ आठ-दहा लोकांची नावे घेऊन त्यांनी भानामती केल्याचे सांगितले. त्याला बळी पडून गावातील काही लोकांनी त्या सर्वांना भरचौकात खांबांना बांधून बेदम मारहाण केली. वृद्ध, महिलांनाही मारहाण करण्यात आली. हा प्रकार सुरू असताना गावातील इतर लोक मूक दर्शक बनले होते. भीतीने कुणीही मध्ये पडले नाही. यात ७ जण जखमी झाले. त्यांना जिवती ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर दोघांना घरी पाठवण्यात आले, तर पाच गंभीर जखमींना चंद्रपूरला हलविण्यात आले.
वणी खुर्द या गावात एका कुटुंबावर जादूटोणा करत असल्याबाबत संशय होता. यातून त्यांना मारहाण करण्यात आली. पोलिसांनी जाऊन त्यांना सोडविले. याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास सुरू आहे.
सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचांदूर
शनिवारी वणी येथे ही घटना घडल्यानंतर लगेच त्या गावात शांततेबाबत बैठक घेण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष दिले जात आहे. काही नागरिकांवर गुन्हा दाखल केला आहे.
संतोष अंबिके, सहायक पोलीस निरीक्षक, जिवती