💻

💻

शेतकऱ्यांच्या विजेसाठी अभियंत्याचा धोकादायक प्रवास. #Powersupply #Engineer

पोंभुर्णा:- शेतकऱ्यांना तातडीने वीजपुरवठा मिळावा, यासाठी वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी चक्क दुथडी भरून वाहणाऱ्या नदीतून रोहित्र नेत वीज पुरवठा अबाधित राखला. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या टोक (गंगापूर) या गावातील दोन कृषिपंप ग्राहकांचे कनेक्शन असलेल्या रोहित्रामध्ये नुकताच बिघाड झाल्याने त्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. या कृषि ग्राहकांसाठी जीवाची पर्वा न करता लाकडी नावेने रोहित्र वाहून नेत त्यांचा वीज पुरवठा पूर्ववत केला गेला. या धाडसी कामासाठी महावितरणचे अभियंते आणि कर्मचारी यांचे राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ट्विट करता अभिनंदन केले.
गंगापूर या गावातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरू करण्यासाठी महावितरणने प्रयत्नांची शर्थ केली. थकबाकीमुक्त शेतकरी व महावितरणचे अभियंता कुणाल पाटील व तंत्रज्ञ यांनी सर्वांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे," अशी प्रतिक्रिया डॉ. राऊत यांनी समाज माध्यमावरील पोस्टमध्ये लिहिली आहे.
टोक (गंगापूर) गावातील दोन कृषिपंप ग्राहक शांताबाई किसन दायले व टेकलू नारायण कस्तुरे या दोन्ही ग्राहकांनी आपले थकीत वीज बिल ११ हजार ७३० रुपये महावितरण कार्यालयात भरले. पण रोहित्र लावण्यासाठी त्याठिकाणी जाण्यास कोणताही रस्ता नसल्याने व पोंभूर्णा ते जुनगाव असा ३० किलोमीटरचा कच्च्या रस्त्याचा खडतर मार्ग असल्याने शेवटी दुथडी वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पात्रातून लाकडी नावेतून नवीन २५ के.व्ही. क्षमतेचे रोहित्र डोंग्यामधून वाहून नेउन बिघडलेले रोहित्र तातडीने बदलण्यात आले. कृषिपंप ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्वरत झाल्याने शेतकऱ्यांनी महावितरणप्रति कृतज्ञता व्यक्त केली.


चंद्रपूर जिल्ह्याच्या टोकावरील गावातील शांता दायले व टेकलू कस्तुरे या कृषी ग्राहकांचा खंडित वीजपुरवठा सुरु करण्यासाठी एमएसईडीसीएल च्या कर्मचाऱ्यांनी २५ केव्हीचे रोहित्र नदीतून डोंग्यामधून वाहून नेले. ही कौतूकास्पद कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन.
ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत