Top News

ऐतिहासिक शिवलिंग व नंदीच्या मूर्तीचा ढासळला पाया! #Chandrapur

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:-:महानगरातील ऐतिहासिक वारसा असलेल्या अपूर्ण देवालय किंवा दशमुख दुर्गा मूर्तीसमुहापैकी शिवलिंग व नंदीच्या मूर्तीचा पाया सततच्या पावसाने शनिवारी ढासळला.
इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे व चमुने यांच्यासह पाहणी करून पुढील हानी टाळण्यासाठी तेथे ताडपत्री टाकले. या शिवलिंग व नंदीच्या मूर्तीची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केली आहे. या संदर्भात भारतीय पुरातत्व विभागाकडे पत्रव्यवहार केल्याची माहिती धोतरे यांनी दिली.
गोंडराजे धुडया रामशहा यांच्या कार्यकाळात 16 शतकात चंद्रपूर येथे 'रायप्पा' नावाचा एक कोमटी जातीचा सधन, संपन्न तसेच धार्मिक प्रवृत्तीचा गृहस्थ होऊन गेला. तो बाबुपेठ परिसरात राहत होता. फार पूर्वी या बाबुपेठ परिसरात असलेले बाभळीचे जंगल कापून गोंडराजे यांनी वसाहती उभारल्या होत्या. त्यामुळे यास 'बाबुपेठ' असे नाव पडले. या परिसरात एकाच दगडात आणी तेसुद्धा रेतीच्या दगडात कोरलेल्या मूर्ती आहेत. प्रत्येक मुर्तीचा आकार भव्य आहे. सर्व मूर्तीचे काम पूर्ण झाल्यावर एक शिवमंदिर बांधून त्यात शंकराच्या पिंडीची स्थापना करावी व आजुबाजुस इतर मूर्ती ठेवावयाच्या असा त्याचा विचार असावा.
पण काम संपत असतानाच त्याचा मृत्यू झाला. ते काम अपूर्ण राहिले. त्याच्या मृत्यूनंतर या मंदिराच्या कामाकडे कुणीच लक्ष दिले नाही. मूर्ती समुहात एकूण 15 मूर्ती असून, त्यात प्रमुख आणि लक्ष वेधून घेणारी मूर्ती म्हणजे दशमुखी दुर्गाची मुर्ती ती 23 फुट लांब, तर 18 फुट रूंद आहे. यास दहा तोेंडे असल्याने यास बराच काळ 'रावणाची' मूर्ती समजत असत. दरवर्षी येथे रावनदहन नंतर लोक यावर दगड फेकीत असत. याचे निरीक्षण केले की लक्षात येईल की रावणाची मुर्ती नसून दशमुखी दुर्गा आहे. या दशमुखी दुर्गाच्या डाव्या हातात शिरकमल आहे. अंगावर दागिणे कोरण्यात आलेले आहे.
बंडू धोतरे यांच्यासह बिमल शहा, जयेश बैनलवार, सचिन धोतरे यांनी दशमुखी दुर्गा मूर्तीसमुह मधील नंदी व शिवलिंग असलेल्या मूर्तीची पाहणी केली. पुढील अनर्थ टाळण्यासाठी त्यांनी ताडपत्री झाकून ठेवली आहे. या परिसराचे सौंदर्यीकरण करून पर्यटकांना आकर्षित करण्याची मागणी बंडू धोतरे यांनी केली आहे.
पुरातत्व विभागाची पाहणी......

दशमुखी दुर्गा मूर्तिसमुह परिसरातील नंदी व शिवलिंग मूर्तीचा ढासळलेला भाग त्वरित दुरस्त करण्याच्या मागणीची दखल भारतीय पुरातत्व विभाग, नागपूर सर्कलचे अधीक्षक पुरातत्वविद रेड्डी यांनी घेतली. स्थानिक पुरातत्व अधिकारी सहायक प्रशांत शिंदे यांना त्वरित पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शनिवारी दुपारपासून शिंदे व त्यांची चमुने पाहणी करीत नंदी-शिवलिंग मूर्तीसह परिसरातील सर्व मूर्तीचे मोजमाप करून मूर्तीचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्यास आवश्यक माहिती गोळा केली. यावेळी इको-प्रो चे बंडू धोतरे, अब्दुल जावेद, बिमल शहा, अमोल उत्तलवार उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने