Top News

गडचिरोलीत जहाल नक्षलवाद्यास अटक. #Arrested

२ लाखांचे होते बक्षीस.
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
गडचिरोली:- जिल्ह्यातील पोमके गट्टा (जां) येथे आज जहाल नक्षलवादी अजय हिचामी याला अटक करण्यात आली. गडचिरोली पोलिसांनी आज नक्षलविरोधी अभियान राबवून ही कारवाई केली असून या नक्षलवाद्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस होते.
नक्षलवादी अजय हिचामी (३०) हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील मौजा झारेवाडा येथील रहिवासी आहे. तो २०१९ मध्ये नक्षल गट्टा दलममध्ये भरती झाला होता. तसेच सध्या सशस्त्र दलम सद्स्य पदावर कार्यरत होता. तसेच तो नक्षलच्या अॅक्शन टीमचा सदस्य होता. सन २०२१ मध्ये पोमके गट्टावर दोन वेळा हल्ला झाला होता. तसेच पोमके बुर्गीवर देखील हल्ला झाला होता. यामध्ये या नक्षलवाद्याचा समावेश होता.
तसेच १८ सप्टेंबरला सुरजागड येथे झालेल्या सोमाजी चैतु सडमेक याच्या खुनामध्ये त्याचा सक्रीय सहभाग होता. 2019 पासून आतापर्यंत त्याच्यावर एकूण 03 खून, 05 चकमक व 01 दरोडा, असे एकूण 09 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या नक्षली कारवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर 02 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. याशिवाय त्याचा आणखी किती गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे याचा तपास गडचिरोली पोलिस दल करत आहे.
पोलिस उपविभाग हेडरीअंतर्गत येणाऱ्या पोमके गट्टा (जां.) हद्दीत आज ११ ऑक्टोबर रोजी तो नहलवादी हजर असल्याची गोपनिय माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने