Click Here...👇👇👇

.......अन् शेतकऱ्यांचा १० मिनिटे बिबट्याशी समोरासमोर झाला सामना. #Leopard #farmers

Bhairav Diwase

चामोर्शी:- चामोर्शी तालुक्यातील आष्टी या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालून दोघांना ठार केल्यानंतर एका बिबट्याला वन विभागाने पिंजऱ्यात जेरबंद केल्याचा दावा केला आहे.
अजूनही या परिसरात इतर बिबट्यांचा वावर कायम आहे. बुधवारी शेतात बैल घेऊन जाताना एका शेतकऱ्याचा बिबट्याशी समोरासमोर तब्बल १० मिनिटे सामना झाला. नशीब बलवत्तर म्हणून त्या शेतकऱ्याचे प्राण वाचले. या प्रसंगाने त्या शेतकऱ्याला चांगलेच हादरवून सोडले आहे.
इल्लूर येथील शेतकरी विश्वनाथ घुसाजी बामनकर हे सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी सकाळी ११.३० वाजता शेतात बैल चारायला घेऊन जात होते.
दरम्यान, बैल थांबले. त्यांना पुढे हाकल्यानंतरही ते पुढे जात नव्हते. बैल का पुढे जात नाहीत, हे पाहण्यासाठी बामनकर पुढे येताच रस्त्यालगतच्या झुडूपातून बिबट्याने रस्त्यावर उडी मारली आणि तो बामनकर यांच्यापुढे उभा राहिला. बिबट्याला पाहताच समोर असलेला एक बैल पळून गेला. मात्र, एका बैलाचा कासरा विश्वनाथ बामनकर यांनी उजव्या हातात घट्ट पकडून ठेवला होता. समोर पाच ते सात फुटावर बिबट उभा आणि त्याला पाहात शेतकरी आणि त्यांचा एक बैलही तिथेच उभा होता. हा थरार जवळपास १० मिनिटे चालला. हातात काठी आणि सोबत बैल असल्याने ते हिंमत ठेवून तिथेच उभे होते.
बैल असल्यामुळे बिबट्याने हल्ला करण्याची हिंमत केली नाही. त्यानंतर बिबट्याने माघार घेऊन तेथून काढता पाय घेतला.
शेतकरी म्हणतात, तुम्हीच उपाय सांगा...

या प्रसंगाने बामनकर यांना चांगलाच थरकाप सुटला होता. त्याच ठिकाणी इल्लूर येथील एका इसमाला बिबट्याने ठार केले होते. त्या झुडुपात बिबट्याने बस्तान मांडलेले असताना वन विभागाने तेथे लावलेले पिंजरे दुसऱ्याच दिवशी का काढले? असा प्रश्न गावकरी करीत आहेत. नशीब बलवत्तर म्हणून प्राण वाचले, असे उद्गार विश्वनाथ बामनकर यांनी काढले. बिबट्याच्या भीतीने जंगलालगतच्या शेतात कसे जायचे? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. तिकडे जंगली डुकरे शेतातील पिकांचे नुकसान करीत आहेत.