Top News

भद्रावतीत राज्यातील पहिल्या तालुकास्तरीय शहर उपजिविका केंद्राचे थाटात लोकार्पण. #program



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- राज्यातील पहिल्या तालुकास्तरीय शहर उपजिविका केंद्राचे येथील घुटकाळा वार्डातील सुविधा केंद्राच्या इमारतीत खासदार व आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच थाटात लोकार्पण करण्यात आले.
या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन खा.बाळुभाऊ धानोरकर यांच्या हस्ते झाले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.प्रतिभाताई धानोरकर होत्या.तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष संतोष आमने, माजी उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी,उपमुख्याधिकारी जगदिश गायकवाड नगरसेवक सुधीर सातपुते, चंद्रकांत खारकर,विनोद वानखेडे आणि इतर उपस्थित होते.
यापूर्वी असे केंद्र जिल्हा स्तरावर सुरु करण्यात आले.मात्र भद्रावती नगर परिषदेने बचत गटांना हाताशी धरून या क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य पहाता केंद्र सरकारने असे केंद्र सुरू करण्यास खास परवानगी दिल्याने उपजिविका केंद्र चालविणारी भद्रावती नगर परिषद ही राज्यातील पहिली नगर परिषद ठरली आहे. सदर उपजिविका केंद्रात स्थानिक तयार झालेल्या वस्तूंची विक्री करून शहरातील बेरोजगारांना रोजगार देण्यात येणार आहे.
यासाठी शहरातील बचत गटांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. याशिवाय या उपजिविका केंद्रात कपडा बॅंक,चप्पल-शुज बॅंक, गोरगरीबांसाठी अल्प दरात बिछायत व कॅटरिंग केंद्रही सुरू करण्यात आले आहे.
यावेळी खा.बाळुभाऊ धानोरकर यांनी आपल्या भाषणातून भद्रावती नगर परिषदेचे अभिनंदन करत या केंद्रात गोरगरीब जनतेसाठी औषधांची सुविधा उपलब्ध करावी अशी संकल्पना मांडली. तर आ.प्रतिभाताई धानोरकर यांनी भद्रावती शहरात बचत गटांद्वारे व स्थानिक बेरोजगारांद्वारे निर्मिती केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी भद्रावती शहरात एक भव्य माॅल सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आपल्या भाषणातून दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रफीक शेख यांनी केले. तर संचालन व आभार प्रदर्शन ज्योती लालसरे यांनी केले. कार्यक्रमाला बचत गटांच्या महिला, नगरसेवक, न.प.कर्मचारी व नागरिक मोठया संख्येत उपस्थित होते.#program

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने