शिकारीच्या संशयातून अमानुष मारहाण. #Beating

Bhairav Diwase

विवस्त्र करून गुप्तांगाला दिले विजेचा शॉक.

वन कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल.
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- शिकारीच्या संशयातून चिचोली येथील सहा गावकऱ्यांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण केली. एकाला विवस्त्र करून चार्जिंग बॅटरीद्वारे त्याच्या गुप्तांगाला करंट दिल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी समोर आली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून दुर्गापूर पोलिसांनी दोन वनकर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चिचोली परिसरातील शिकारीच्या संशयावरून वनविभागाचे सुमारे ५ कर्मचारी २४ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता गावात आले. त्यांनी ईश्वर रामटेके, हनुमान आसूटकर, संदीप आसूटकर, आकाश चांदेकर यांच्यासह इतर दोघांची शिकारीच्या संशयावरून चौकशी सुरू केली. एवढ्यावरच न थांबता या सर्वांना वनविभागाच्या कार्यालयात नेऊन बेदम मारहाण केली. चार्जिंग बॅटरीद्वारे त्यांच्या हात आणि पायाला करंट दिला. सायंकाळी चंद्रपुरातील रामबाग नर्सरीमध्ये नेऊन त्यांना पुन्हा मारहाण केली. एकाला निर्वस्त्र करून गुप्तांगावर करंट दिल्याचा आरोपही पोलिस तक्रारीतून करण्यात आला आहे. याविषयीची माहिती समजताच गावकऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांना माहिती दिली.
त्यांनी ॲड. फरहत बेग व गावकऱ्यांसोबत जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दिली. लवकरात लवकर दोषींची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तत्काळ बडतर्फ करावे, अशी मागणी केली. यानंतर दोन वनकर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, ही घटना कुठल्या वन्यजीवाच्या शिकारीवरून झाली हे अजूनही समोर येऊ शकलेले नाही.