Top News

भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झालेल्या जवानाचे भद्रावतीत जंगी स्वागत. #Bhadrawati


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भारतीय सैन्यात २४ वर्षे सेवा देऊन सेवानिवृत्त झालेल्या जवानाचे भद्रावतीत दि. ३० ऑक्टोबर रोजी भद्रावती शहरातील नागरिकांकडून जंगी स्वागत करण्यात आले.

भद्रावती शहराच्या सुमठाना वस्तीतील रहिवासी मुकुंद माधव साव हे दि.२२ ऑक्टोबर १९९७ रोजी भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांच्या सेवेचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ते आता निवृत्त झाले. अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या चीनच्या सीमेवरून ते दि. ३० ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता भद्रावतीत दाखल झाले.
भद्रावती शहरात त्यांचे आगमन होताच पुष्पगुच्छ देऊन आणि हार घालून जंगी स्वागत करण्यात आले. भद्रावती शहरात आगमन होताच साव यांनी सर्वप्रथम जुन्या बसस्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर दीप प्रज्वलन करून बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर खुल्या जीपमध्ये मुकुंद साव यांची सुमठाना येथील वेळुवन बुद्ध विहारापर्यंत वाजत-गाजत सपत्नीक मिरवणूक काढण्यात आली. तेथेही त्यांचे स्वागत करण्यात आले.
  मुकुंद साव यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण आयुध निर्माणी हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर बारावीचे शिक्षण सेंट मायकेल कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर येथून पूर्ण केले. नववी-दहावीमध्ये शिकत असतानाच साव यांच्या मनात सैन्यात भरती होण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी व्यायाम, रनिंग या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले.सैन्यात असताना कारगिल युद्धात त्यांचा सहभाग राहिला आहे. तसेच पठाणकोट हल्ल्याच्या वेळीही त्यांनी विशेष कामगिरी बजावली.शांती सैनिक म्हणूनही ते दक्षिण आफ्रिकेतील कांगो येथे जाऊन आले. त्यांचे वडील माधव साव हे चांदा आयुध निर्माणी येथे
चार्जमन होते. तर मोठे भाऊ नागपूर येथे पोलिस आहेत. अशा प्रकारे साव कुटुंबियांचा देशसेवेत मोठा सहभाग आहे. विशेष म्हणजे मुकुंद यांची थोरली कन्या नित्कर्षा हीलासुद्धा एन.डी.ए.अधिकारी व्हायचे आहे.
     मुकुंद साव हे सेवानिवृत्तीच्या वेळी सैन्यात नायब सुभेदार एसीपी.,एनएसजी ब्लॅक कॅट कमांडो या पदावर कार्यरत होते. देशसेवा केल्याचा आनंद आहे. ज्याच्या हृदयात ख-या अर्थाने देशसेवा करायची आहे, तोच या क्षेत्रात येऊ शकतो. ब्लॅक कॅट कमांडोचे तीन महिन्यांचे अतिशय खडतर प्रशिक्षण असते. ते मी पूर्ण केले. सेवानिवृत्तीनंतर मला आता भद्रावती शहरात सामाजिक कार्यकर्ते पनवेल शेंडे यांचे सहकार्य घेऊन अकादमी सुरु करायची आहे. त्यामुळे भद्रावती तालुक्यातील जास्तीत जास्त युवक सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करतील असेही मुकुंद साव यांनी पत्रकारांना सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने