Top News

ED चा दिवाळीतच धमाका. #ED


माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक.


नागपूर:- सोमवारी मध्यरात्री एक अत्यंत मोठी घडामोडी घडली आहे. नुकत्याच मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ईडीकडून ही अटक करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

अनिल देशमुखांच्या अटकेचं ED ने काय दिलं कारण?

अनिल देशमुख हे सोमवारी (1 नोव्हेंबर) दुपारी 12 वाजेच्या सुमारास अचानक ईडीच्या कार्यालयात दाखल झाले होते. साधारण दुपारी बारा वाजता ईडी कार्यालयात गेलेल्या अनिल देशमुख यांची रात्री साडेबारा वाजेपर्यंत ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु होती. मात्र, चौकशीदरम्यान अनिल देशमुख हे सहकार्य करत नसल्याचा दावा करत ईडीने त्यांना अटक केली. आता ईडी अनिल देशमुख यांची कोठडी मिळावी यासाठी त्यांना 2 नोव्हेंबरला न्यायालयात हजर करणार आहे.

अनिल देशमुख यांना आतापर्यंत ईडीने तब्बल पाच समन्स बजावले होते. परंतु ते ईडीसमोर हजर झाले नव्हते. मात्र, सोमवारी सकाळी अचानक ते ईडी कार्यालयात दाखल झाले होते. यानंतर ईडीकडून त्यांची तब्बल 12 तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली.

ईडीकडून बजावण्यात आलेल्या समन्सच्या विरोधात अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळले आणि त्यांना त्यांच्या वकिलासह ईडी अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते.

दरम्यान, ईडीसमोर हजर राहण्यापूर्वी अनिल देशमुख यांनी ट्विटरवरुन काही माहिती दिली होती. ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की, ‘हायकोर्टाच्या आदेशानुसार मी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर होत आहे आणि मी माझ्या वकिलांसोबत ईडीसमोर हजर राहणार आहे. दरम्यान, यापूर्वी ईडीच्या अधिकार्‍यांनी या वर्षी जूनमध्ये अनिल देशमुख यांचे पीए कुंदन शिंदे आणि पीएस संजीव पालांडे यांना अटक केली होती.

नेमकं प्रकरण काय?

ईडीचा अनिल देशमुखांविरोधात असा आरोप आहे की, तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाझे याने काही हॉटेल मालकांकडून 4.3 कोटी रुपये उकळले होते. जे नंतर त्याने देशमुखांच्या सहाय्यकांना दिले होते. यानंतर दिल्लीस्थित शेल कंपनीच्या माध्यमातून हेच पैसे नागपूरमधील देशमुख आणि कुटुंबाद्वारे चालवल्या जाणार्‍या शैक्षणिक ट्रस्टला देण्यात आले होते.

ईडीने या प्रकरणी अनेक ठिकाणी छापेही टाकले होते. तत्कालीन सहाय्यक निरीक्षक सचिन वाझे याच्यामार्फत देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांची वसूलीचे जे आरोप करण्यात आले होते त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ईडीकडून अनिल देशमुख यांना चौकशीसाठी वारंवार समन्स बजावण्यात आलेलं होतं. पण देशमुख ईडीसमोर हजर झाले नव्हते. त्यामुळे मागील काही दिवसांपासून अशीही चर्चा सुरु होती की, अनिल देशमुख हे देश सोडून पळू तर गेलेले नाही ना? पण आज सकाळी अनिल देशमुख हे अचानक ईडी कार्यालयात आले आणि चर्चांना पूर्णविराम दिला. अखेर रात्री उशिरा ईडीकडून त्यांना अटक करण्यात आली आहे. #साभार

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने