(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- आई घंटा गाडी चालवते, तर वडील कंत्राटी नौकरीवर. घरी बेताची परिस्थिती. त्यामुळे शिक्षण घेताना असंख्य अडचणी येत होत्या. आपल्याला लवकर नोकरी शोधायची आहे, असा विचार अजित खिल्लन या मुलाच्या मनात होता. त्यातून त्याने सैन्य भरती विषयी माहिती घेतली. त्याच्या मनात देखील सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्याची जिद्द निर्माण झाली. त्यासाठी त्याने कठोर परिश्रम घेतले.
रोज सकाळ- संध्याकाळ धावायला जाणे, खेळणे, कठोर मेहनत घेतली. त्याच्या परिश्रममध्ये त्याच्या शेजारी राहणारे काँग्रेस चे कार्यकर्ते सुनील चौहान यांनी देखील त्याची मदत केली अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अजित याने ही वाट धरली व त्यात तो यशस्वी झाला. त्याला अरुणाचल प्रदेशमध्ये नियुक्ती मिळाली आहे. याची माहिती महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या सचिव नम्रता आचार्य- ठेमस्कर यांना सुनील चौहान यांनी दिली. त्याचे अभिनंदन करण्यासाठी ठेमस्कर अजित याच्या वॉर्डात सावरकर नगरमध्ये गेल्या व त्याचे अभिनंदन करून त्याला शुभेच्छा दिल्या. त्याचा आतापर्यंतचा प्रवास समजून घेतला. त्याच्या आई- वडिलांची देखील विचारपूस केली.
अजित ने आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई राजेश्वरी वडिला मनोरंजन खिल्लन यांना दिले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मतीन कुरेशी, सेवादल महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा लता बारापात्रे, ब्रिजेश तामगडे, सुनील चौहान, अमित यादव, आकाश वर्मा, सलमान पठाण, करण नायर, राहुल यादव, सागर पोचम, सागर पट्टेबहादूर, मंगेश चिवंडे, अजय शर्मा, आकाश ठाकूर यांची उपस्थिती होते.