विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा ऑफलाईन. #Exam

Bhairav Diwase

परीक्षा मंडळाच्या सभेत चर्चा; १० जानेवारीपासून सुरूवात.

गडचिरोली:- गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाची सभा नुकतीच पार पडली. या सभेत चर्चा करून हिवाळी २०२१ परीक्षेचे स्वरूप स्पष्ट करण्यात आले. गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र २०२१-२२ मधील हिवाळी लेखी परीक्षा १० जानेवारी २०२२ पासून ऑफलाइन सुरू होणार आहे. सदर परीक्षा एमसीक्यू (MCQ) व ओएमआर (OMR) पद्धतीने घेण्यात येणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रांना ऑनलाईन प्रश्नपत्रिकेचा पुरवठा करण्यात येईल. विद्यार्थ्यांची एक तासाच्या अवधीची परीक्षा घेतली जाणार आहे.

कोविड १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून परीक्षा केंद्रांवर गर्दी टाळता येईल यासाठी चार पाळीत म्हणजे सकाळी ९.३० ते सायंकाळी ४.३० या वेळेत घेतल्या जाईल. विद्यापीठाने सीजीएस बदल करुन अभ्यासक्रमात सीबीसीएस अभ्यास प्रणाली अमलात आणलेली आहे. त्याअनुषंगाने जुन्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना सदर अभ्यासक्रम पास करण्याकरिता संधी दिली होती. त्यानंतरसुध्दा काही विद्यार्थी संघटनांनी केलेल्या विनंतीला अनुसरून अशा सर्व विद्यार्थ्यांना उन्हाळी २०२० मध्ये शेवटची संधी देण्यात आली होती. तरीही काही विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी संधी देण्याबाबत अर्ज केला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना हिवाळी २०२१ च्या लेखी परीक्षाकरिता संधी दिली जाणार आहे.

सभेच्या अध्यक्षस्थानी प्र. कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. सुरेश रेवतकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अनिल चिताडे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. जी. एफ. सूर्या, सहयोगी अधिष्ठाता डॉ. धनराज पाटील, डॉ. अरुंधती निनावे , प्राचार्य डॉ . लडके , डॉ . बी . आर. देशमुख आदी उपस्थित होते
. #साभार