चेक आष्टा गावात घरोघरी जाऊन लावली संविधानाची प्रास्ताविका. #Pombhurna


चेक आष्टा शाळेचा अनोखा उपक्रम.
27 नोव्हेंबर पासून होणार रोज संविधानाच्या पाच कलमांचे वाचन आणि स्पष्टीकरण.
पोंभुर्णा:- दि. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारत देशाने भारतीय संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून स्वीकारले. हा दिवस संपूर्ण भारतामध्ये संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्या दिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चेकआष्टा शाळेत एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
राज्यघटनेविषयी विद्यार्थ्यांना तसेच गावातील स्त्री पुरुष मंडळींना माहिती व्हावी. त्यांना संविधानाने दिलेले अधिकार आणि त्यांचे कर्तव्य समजावे. त्यांनी संविधानाचे वाचन करावे. संविधानात नेमके काय आहे? याचा नेमका उद्देश काय? हे समजण्यासाठी गावात विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन घराच्या भिंतीवर तसेच दारावर संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रत लावली. संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी अनेक घोषवाक्याची फलके तयार केली. गावातून निघालेल्या संविधान रॅली मधून "भारताचा अभिमान, संविधान! सविधान!', 'समता, बंधुता, लोकशाही, संविधानाशिवाय पर्याय नाही,' 'भारतीय संविधान के रचनाकार, बाबासाहेब की हो जय जयकार', 'ना किसी धर्म से, ना किसी सोच से, देश चलता है सिर्फ संविधान से', 'अरे डरने की क्या बात है, संविधान तुम्हारे साथ है', ' नको ताई घाबरू, चल संविधान राबवू ', अशा घोषणा मुलांनी बँड पथकासह दिल्या. संविधान दिनानिमित्त मुलांचा उत्साह अद्वितीय होता. तसेच ग्रामपंचायत मध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी सरपंच कांताताई मडावी, उपसरपंच तथा इतर सदस्य आणि ग्रामसेवक यांना संविधान प्रास्ताविकेची प्रत दिली.
   
        संविधान रॅली नंतर शाळेत रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर शाळेमध्ये 'संविधान दिवस' साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण यामावर सर, मुख्याध्यापक तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून लाकडे मॅडम, पोगुलवार सर , शिंगाडे सर उपस्थित होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. शिंगाडे सरांनी प्रास्ताविका विद्यार्थ्यांना समजून सांगितली तर पोगुलवार सरांनी आपल्या भाषणातून संविधानावर प्रकाश टाकला.
     
       सतिश शिंगाडे सर यांच्या संकल्पनेतून दिनांक 27 नोव्हेंबर पासून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चेक आष्टा येथे दुसरा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत रोज संविधानाच्या पाच कलमांचे वाचन करून त्या कलमांचे स्पष्टीकरण मुलांना समजावून सांगण्यात येईल, असे अरुण यामावार सर, मुख्याध्यापक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले.
        आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. लाकडे मॅडम आणि आभार प्रदर्शन कु. दिपाली कुळमेथे हिने केले. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापक अरुण यामावार सर सतीश शिंगाडे सर, सविता लाकडे मॅडम, विनोद पोगुलवार सर, शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी सहकार्य केले.
 विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटनेचे ज्ञान व्हावे आणि त्यांचे अधिकार आणि कर्तव्य समजावे, तसेच देशाचा कायदा लक्षात यावा, यासाठी हा अनोखा उपक्रम शाळेने हाती घेतला आहे..
 अरुण यामावार, मुख्याध्यापक 
 जि. प. उ. प्रा. शाळा चेक आष्टा.
भारत देशाचा नागरिक म्हणून या देशाचे संविधान प्रत्येकाला समजावे ही काळाची गरज आहे. कारण संविधानाशिवाय आपण नाही. म्हणून संविधान जाणीव जागृती होणे आवश्यक आहे. देशाचा सुजाण नागरीक तयार करण्यासाठी विद्यार्थिदशेपासूनच संविधान समजून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थिदशेपासून विद्यार्थ्यांना संविधानाची माहिती झाली तर भारताचा एक सुजाण नागरिक घडवण्यास मदत होईल.
सतीश शिंगाडे विज्ञान विषय शिक्षक
जि. प. उ. प्रा. शाळा चेक आष्टा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत