हातात आलेला पिक गेल्याने शेतकरी झाला हवालदिल. #Pombhurna


धान पिकाला पावसाचा फटका; सर्वे करून नुकसान भरपाईची देण्याची मागणी.
पोंभूर्णा:- अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे पोंभूर्णा तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेले धान पीक पाण्यात बुडाल्यामुळे फार मोठे नुकसान झाले आहे. कापून ठेवलेले धान उन्हात वाळविण्यासाठी ते अथक प्रयत्न करीत आहेत. मात्र, अद्यापही शेकडो एकर क्षेत्रातील धान पिक पाण्यात बुडालेले आहे. सरकारी स्तरावरुन अद्याप सर्व्हे सुरू करण्यात आला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
चांगला पाऊस झाल्याने धान पिक चांगले येईल अशी अपेक्षा होती. मात्र, ऐन कापणी बांधणीच्या वेळेवरच निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे. शेतांमध्ये सध्या कापणी, मळणीची कामे सुरू आहेत. मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरले आहे. पाण्यात बुडालेल्या धानाचे लोंब खराब होऊ लागले आहे. पिकांचे सुमारे ६० टक्के नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील, चिंतलधाबा, देवाडा खुर्द, जामतुकूम, जामखुर्द, चेक ठाणा, कवठी, ,दिघोरी, घोसरी, आंबेधानोरा, उमरी, सातारा तुकूम, घनोटी, डोंगर हळदी, थेरगाव, वेळवा, देवाडा बुद्रुक, जुनगाव आदी गावांत धान पिकाचे फार मोठे नुकसान झाले आहे. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत