Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी....! #Alcohol

गडचांदूरात दुधापेक्षा दारूची दुकाने जास्त!

पुन्हा एक देशी दारू दुकानाच्या आगमनाची चर्चा.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- गडचांदूरात पुन्हा एक नवीन दारू दुकानाचे लवकरच आगमन होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे.यामुळे मद्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून ना-हरकरतसाठी नगरपरिषदकडे अर्ज सुद्धा केल्याचे कळते.हे खरे असेल तर भविष्यात या शहरात दुधापेक्षा दारूची दुकानेच जास्त दिसतील यात दुमत नाही.
एकामागे एक येणाऱ्या दारूच्या दुकानांमुळे शहरातील शांततेला गालबोट लागण्याची भीती व्यक्त होत आहे. मागील कित्येक दिवसांपासून शहरवासी विशेषतः साईशांती नगर व परिसरातील नागरिक डस्ट प्रदूषणाच्या समस्येमुळे हैराण झाले आहे. याविषयी ठराव घ्या म्हणून साईशांती नगरवासी स्थानिक नगरपरिषदेचे उंबरठे झिजवत आहे.मात्र दरवेळी उडवाउडवीची उत्तरे पदरी पडत आहे. असे असताना मात्र नवीन दारू दुकानाला ना-हरकत देण्यासाठी तडकाफडकी विशेष सभा बोलावून बहुमताने ठराव पास केले जात असल्याचे प्रकार याठिकाणी घडत आहे.
मागील जुलै महिन्यात नगराध्यक्षांनी विरोधी नगरसेवकांच्या तिव्र विरोधाला न जुमानता विशेष सभेचे आयोजन करून एका स्थलांतरित दारू दुकानाला ना-हरकत दिले.हे नियमबाह्य व बेकायदेशीर असल्याचे नमूद करत विरोधी पक्ष नगरसेवक अरविंद डोहे यांनी सभा रद्द करण्यासाठी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना विनंतीचे निवेदन दिले. शेवटी मात्र ठरल्याप्रमाणे ती सभा झालीच. यात 5 पैकी चार विषय मंजूर करण्यात आल्याचे कळते. त्यातील चौथा विषय स्थलांतरित दारू दूकानाचा होता.नेमका यालाच विरोधी पक्ष नगरसेवकांनी विरोध दर्शवला होता.
अगोदरच या शहरात 11 च्या जवळपास विदेशी व 4 देशी दारूची दुकाने असताना त्यावर पुन्हा एकाची भर पडली.याच्या विरोधात तेथील वार्डवासीयांना सोबत घेऊन शिवसेनेने मोठे आंदोलन उभारले होते.या नवीन दारू दुकानापुढे यांनी चक्क दुधाचे वाटप केले.यासर्व घडामोडींमुळे बोंबाबोंब झाल्याने नगरपरिषदेची मोठ्याप्रमाणात किरकिरी झाली.हे प्रकरण कसेबसे निवडत असतानाच आता पुन्हा एक नवीन दारू दुकानाच्या आगमनाची चर्चा ऐकायला मिळत आहे.असे असेल तर येणाऱ्या काळात गडचांदूरात दारूचा महापूर वाहताना दिसेल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
     काही महिन्यांपासून सातत्याने सर्वसाधारण सभेच्या तारखा पुढे ढकलल्या जात असल्याचे बोलले जात आहे.परंतू आज ना उद्या सभा होणारच. आता एकीकडे डस्ट प्रदूषण तर दुसरीकडे पुन्हा एकदा नवीन दारू दूकान,हे दोन्ही मुद्दे नगरपरिषदेच्या दालनात पोहोचले आहे. नगराध्यक्षा आता यापैकी कोणत्या मुद्याला विषयसुचित प्राधान्य देऊन बहुमताने मंजूर करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. काहीका असेना पण शहरात पुन्हा एक नवीन दारू दुकानाच्या आगमनाची वार्ता पसरल्याने मद्यप्रेमी आनंद व्यक्त करत असून तो दिवस केव्हा येईल याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे हे मात्र विशेष. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत