💻

💻

आज रात्रौ १० वाजता नंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील सहा नगर पंचायतींच्या निवडणुका रंगतदार होत आहे. राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. उमेदवार डोअर टु डोअर प्रचारात गुंतले आहेत. आपल्याच पक्षाची सत्ता आणण्यासाठी निवडणुकीची धुरा आजी-माजी पालकमंत्र्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. काँग्रेसकडून पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार तर भाजपकडून माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार तर शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी कंबर कसल्याने निवडणुकीची चुरस चांगलीच वाढली आहे.

सिंदेवाही, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना व जिवती या सहा नगर पंचायतींची निवडणूक २१ डिसेंबरला होत आहे. ओबीसी प्रवर्ग रद्द झाल्याने या प्रवर्गाच्या निवडणुका १८ जानेवारीला घेण्यात येणार आहे. उर्वरित जागांवर आपल्याच पक्षाचे उमेदवार कसे निवडून येतील, यासाठी स्थानिक पुढारी प्रचारात व्यस्त आहेत. या पुढाऱ्यांना बुस्टर डोस देण्याचे काम जिल्ह्यातील बडे नेते करत आहेत. 

कोणत्या पक्षाची होती सत्ता.....

जिवती, कोरपना, सावली नगर पंचायतीवर काँग्रेसची सत्ता होती. सिंदेवाही व गोंडपिपरीत अडीच वर्षे भाजप, तर अडीच वर्षे काँग्रेसने सत्ता उपभोगली. पोंभूर्णा भाजपच्या ताब्यात होती. आता आपल्याच पक्षाची सत्ता यावी यासाठी भाजप व काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन पार्टी, भुमिपुत्र ब्रिगेडनी आपला उमेदवार उभा करून तगडे आव्हान देत आहे. या सहा नगर पंचायतींवर कुणाची सत्ता येणार हे आता मतमोजणीनंतर कळणार आहे.

आमदार, खासदार, माजी मंत्री आणि नेते मंडळी प्रचारात..... 

भाजपकडून आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, माजी आमदार ॲड संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे सांभाळत आहे. काँग्रेसकडून जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्यासह खा. बाळू धानोरकर, आ. सुभाष धोटे, राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे हे सांभाळत आहे. तर शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे  हे सांभाळत आहे. या सर्व नेते मंडळींनी सभा घेऊन चुरस निर्माण केली आहे.

आज प्रचाराचा शेवटचा दिवस....

जिल्ह्यातील सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही – लोनवाही नगर पंचायतीमधील सदस्य पदाच्या सार्वत्रिक तसेच नागभीड नगर परिषदेमधील पोट निवडणुकीकरीता प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

जिल्ह्यात 6 नगर पंचायतींत निवडणुकांचा धुराळा उडत असून, उमेदवार व त्यांचे समर्थक प्रचारात गुंतले आहेत. रविवार, 20 डिसेंबर रात्री 10 वाजतानंतर प्रचारतोफा थंडावणार असून, गुप्तभेटीवर भर दिला जाणार आहे. मंगळवार, 21 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार उपरोक्त नगर परिषद /पंचायतीमधील सार्वत्रिक / पोट निवडणुकीकरीता मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवार दि. 20 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता नंतर जाहीर प्रचारावर बंदी असेल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत