परीक्षेसाठी ऑनलाईन व ऑफलाइन दोन्ही पर्याय द्या #Gadchiroli

अभाविप ची गोंडवाना विद्यापीठाला दिलेल्या निवेदनातून मागणी

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
गडचिरोली:- परीक्षा मंडळाच्या सभेत गोंडवाना विद्यापीठाची हिवाळी 2021 ची परीक्षा 10 जानेवारीपासून ऑफलाइन घेण्याचे ठरविले आहे. परंतु गेल्या दोन वर्षाची शैक्षणीक परिस्थिती बघता विद्यार्थ्यांमध्ये या परिक्षेबद्दल बरेच संभ्रम निर्माण झाले आहेत व वर्तमानमध्ये वसतिगृह व एसटी बसेस बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना असुविधा निर्माण झाली आहे.
आता ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत, त्यांचे शिकवणी वर्ग व प्रात्यक्षीक ऑनलाईनच झालेले आहेत. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून विद्यापीठ प्रशासनाने ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे आणि या दोन्ही पैकी एक पर्याय निवडण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गोंडवाना विद्यापीठाला दिलेल्या निवेदनातून केली आहे.
ऑनलाइनपद्धतीने परीक्षा घेतल्यास परिक्षेच्या 1 महिना अगोदर विद्यार्थ्यांना प्रश्‍नांचे एक प्रश्‍नसंच उपलब्ध करुन देण्यात यावे व विद्यार्थ्याना शिकवून झालेल्या अभ्यासक्रमावर आधारित परिक्षा घेण्यात यावी, असेही निवेदनात अभाविपने म्हटले आहे. निवेदन देताना विदर्भ प्रदेश सहमंत्री अभिषेक देवर, गडचिरोली जिल्हा संयोजक अंकुश कुनघाडकर, विद्यार्थिनी प्रमुख संतोषी सुत्रपवार, अपूर्व मुजुमदार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत