(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) सौरभ चौधरी, सावली
सावली:- सावली नगरपंचायतीची निवडणूक येत्या २१ डिसेंबरला होत आहे. त्याकरिता अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून उमेदवारी मिळविण्यासाठी धडपडत आहेत. काही पक्षांकडे उमेदवारांची भाऊगर्दी असली तरीही, ती निवडक वॉर्डासाठीच दिसून येत आहे. मात्र, काही वॉर्डामध्ये उमेदवार मिळविण्यासाठी राष्ट्रीय पक्षांची दमछाक होत आहे.
सतरा नगरसेवकांच्या नगरपंचायतकरिता सर्वच पक्षांनी उमेदवारांची शोधमोहीम अजूनही कायम ठेवली आहे. काँग्रेस, भाजपा बसपा, वंचित बहुजन आघाडी या पक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेसही निवडणूक रिंगणात उडी घेण्याची शक्यता आहे. नगरातील वॉर्ड क्रमांक दोन आणि चार या प्रभागाकडे संपूर्ण सावलीकरांचे लक्ष लागून आहे. वॉर्ड क्रमांक दोन सर्वसाधारण प्रभाग आहे.
मागच्या निवडणुकीत या प्रभागातून बसपाच्या एकमेव उमेदवाराने बाजी मारली होती मात्र अल्पावधीतच काँग्रेसचा हात पकडल्याने प्राबल्य कमी झाल्याचे जाणवत आहे, तर वॉर्ड क्रमांक चार हा प्रभाग सर्वसाधारण असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर आरक्षण बदलून ना.मा.प्र.साठी राखीव झाल्याने या भागात अनेक दिग्गजांनी इच्छा व्यक्त केली आहे. संपूर्ण सावलीकरच नाही, तर नेत्यांचेही या प्रभागात विशेष लक्ष राहण्याची शक्यता आहे.
माजी नगरसेवकांचा कार्यकाळ संपूर्ण सावलीकरांच्या नजरेसमोर असताना त्यापैकी काही उमेदवारांना नागरिकांच्या माथी मारण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत अर्थनीती मतदारांना प्रभावित करण्याची शक्यता कमी आहे. सुज्ञ सावलीकर उमेदवारांची सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन मतदान करण्यावर ठाम असल्याचे बोलले जात आहे. उमेदवारांची शोधमोहीम पक्षश्रेष्ठींसाठी डोकेदुखी ठरणारी आहे. आपल्या वॉर्डातून उमेदवार कोण? यावरही पैज लागण्याची शक्यता आहे. उमेदवार निश्चिती आधीच ही निवडणूक रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. सावलीकरांचे लक्ष उमेदवार निश्चितीकडे लागले आहे.