💻

💻

वाघाच्या बछड्याचा मृतदेह आढळला #Tiger #death #Chandrapur

चंद्रपूर:- चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील मोरवा बिट अंतर्गत येणार्‍या महाऔष्णिक वीज केंद्र परिसरातील आवंडा-धरण परिसरात एका वाघिणीच्या मादी बछड्याचा मृतदेह बुधवारी रात्रीच्या सुमारास आढळून आला.
मृत बछडा अंदाजे 5 ते 6 महिन्याचा असून, त्याचे अवयव कायम असल्याची माहिती चंद्रपूर वनविभागाचे विभागीय वनाधिकारी दीपेश मल्होत्रा यांनी दिली. बछड्याच्या शरिरावर ठिकठिकाणी जखमा असल्याने कदाचित झुंजीत हा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच विभागीय वनाधिकार्‍यासह सहायक वनसंरक्षक निकिता चौरे, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, इको-प्रोचे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. मृतदेह बाहेर काढून गुरूवारी मृत बछड्याची उत्तरीय तपासणी करण्यात आली. मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. व्हिसेरा प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. उत्तरीय तपासणीनंतर ट्रान्झिट उपकेंद्र परिसरात मृत वाघिणीच्या बछड्याचे दहन करण्यात आले. सावली वनपरिक्षेत्रात वाघाची शिकार व चंद्रपूर वनपरिक्षेत्रात वाघाच्या बछड्याचा मृतदेह आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत