Top News

चंद्रपूरात नवजात बालकांना विकणारी टोळी अटकेत #arrested

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- एचआयव्ही झाल्याची भिती दाखवून 10 दिवसाच्या बाळाला 2 लाख 75 हजारांना विक्री केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात उघडकीस आली आहे. महिलेचा तक्रारीवरून पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली.
चंद्रपूर येथील शासकीय रूग्णालयात 13 जानेवारीला पीडित महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. महिलेच्या घराशेजारी राहणारी मिना राजू चौधरी ही महिला रुग्णालयात वारंवार भेटायला येत होती. डिस्चार्ज मिळाल्यानंतर मिनाने बाळंतीण बाईला घरी न नेता लोटस हॉटेलले नेते आणि बाळाला एचआयव्ही झाल्याचे सांगत भीती दाखवली. बाळाला सुरक्षित ठेवण्यासाठी नागपूरमधील ओळखीच्या संस्थेकडे देऊन असे सांगितले.
भितीपोटी पीडितेने नागपूर येथून आलेल्या तीन महिलांना बाळ सोपवले. यानंतर 18 जानेवारीला मिना चौधरी ही महिला पीडितेच्या घरी गेली आणि तिने 49 हजार रुपये दिले. आपलेच बाळ सांभाळण्याचे आपल्याला पैसे कसे? असा संशय पीडितेला आला आणि तिने बाळाला भेटण्याचा आग्रह धरला. मात्र मिना चौधरीने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पीडितेच्या संशय बळावला.
पीडित महिलेने अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला आणि रामनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक संदिप कापडे यांनी मिना चौधरी हिला ताब्यात घेतले आणि त्यानंतर चौकशीत धक्कादायक प्रकार पुढे आला.
मिना चौधरी हिने प्रियकर जाबिर रफिक शेख व उर्जुग सलीम सय्यद यांच्या मदतीने नागपुरातील वनिता कावडे, पुजा शाहु, शालीनी मोडक यांना 2 लाख 75 हजार रूपयात बाळ विकल्याची कबुली दिली. नागपुरातील वनिता कावडे, पुजा शाहु, शालीनी मोडक यांना ताब्यात घेत नवजात बाळाची चौकशी पोलिसांनी केली. अखेर चंद्रपूर येथील स्मिता मानकर या महिलेकडे बाळ ठेवल्याची माहिती समोर आली.
पोलिसांनी बाळाला ताब्यात घेतले असून त्याला वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. मिना चौधरी, जाबिर रफिक शेख, अजुम सलीम सय्यद, वनिता मुलचंद कावडे, पुजा सुरेंद्र शाहु, शालीनी गोपाल मोडक यांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने