Click Here...👇👇👇

टोलनाक्यावर ट्रकचालकांना लुटणारी टोळी अटकेत#arrested

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- घुग्घुस-चंद्रपूर मार्गावरील धानोरा फाटा टोल नाक्यावर दोन ट्रकचालकांना मारहाण करून त्यांच्याकडून पैसे हिसकावून नेणार्‍या टोळीला घुग्घुस पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गडचांदूर येथून अटक केली आहे.
आरोपींमध्ये अनुराग रत्नप्पा भोसले (48), जॅकी गुज्जा भोसले (23), सिनू किसन पवार (40, रा. वल्लमनगर कॉलनी, रेल्वे स्टेशन जवळ, पुलगाव, जिल्हा वर्धा) यांच्यासह एका विधीसंघर्ष बालकाचा समावेश आहे.
धीरज वीरेंद्र प्रसाद यादव (20, रा. बासघात, जि. गोपालगंज, बिहार) हा ट्रकचालक 5 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास चंद्रपूर मार्गांवरील धानोरा फाटा टोल नाक्यावर ट्रकमध्ये झोपला असता, चार अनोळखी व्यक्तीने ट्रॅकच्या कॅबीनमध्ये प्रवेश केला व चाकूचा धाक दाखवून लोखंडी सळाखीने मारहाण करीत त्यांच्या खिशातील 3 हजार रुपये हिसकावून नेले. तसेच बाजूला उभा असलेल्या ट्रकचाचालक महेंद्रकुमार प्रेमशंकर दुबे हा ट्रकच्या कॅबीनमध्ये झोपला असताना त्याच्या फुलपॅन्टच्या खिसातील 4 हजार 700 हजार रुपये हिसकावून नेले. या प्रकरणात ट्रकचालकांच्या तक्रारीवरून घुग्घुस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणाद्वारे गुन्हे शोध पथकाला गुन्ह्यातील संशयीत व्यक्ती गडचांदूर येथील शेतशिवारात लपून असल्याची माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने घुग्घुस पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी. आर. पुसाटे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथक त्या ठिकाणी पोहचले. यावेळी पोलिसांना बघताच चार व्यक्ती पळू लगाल्या. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आणून विचारपूस केली असता त्यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी यातील तीन आरोपींना अटक करून विधीसंघर्ष बालकाला पालकाच्या ताब्यात दिले आहे.
या आरोपींनी असा गुन्हा अन्य परिसरात केला असल्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यातील दोन आरोपीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले 50 हजार रुपये किंमतीचे 8 भ्रमणध्वनी, 8 धारदार चाकू, दोन कैची, एक कुर्‍हाड, दोन सिम कार्ड, 3 हजार 700 रोख रुपये असा एकूण 53 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 13 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक पुसाटे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक अंबादास टोपले, गुन्हे शोध पथकाचे मनोज धकाते, महेंद्र वन्नकवार, रंजित भुरसे, प्रकाश करमे, महेश मांढरे, नितीन मराठे, रवी वाभीटकर, सचिन वासाडे व छगन जांबुळे यांनी केली.