गडचिरोली:- वडीलोपार्जीत जबराण जमिनीवर पारे टाकण्यासाठी अटकाव करत लाचेची मागणी करून २२ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धानोरा तालुक्यातील रांगी क्षेत्र सहाय्यक कार्यालयातील वनरक्षक व वनमजूराला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.सदर कारवाई आज मंगळवारी करण्यात आली.
वनरक्षक रणजीत प्रभुलाल कुडावले (५०) व वनमजुर देवराव रामचंद्र भोयर (५२) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.प्राप्त माहितीनुसार, तक्रारकर्त्याची वडीलोपार्जीत दोन एकर जबराण जमीन असून अनेक वर्षापासून ते तिथ शेती करून उदरनिर्वाह करत आहेत. तक्रारदार हे सदर शेत जमीनीवर ट्रॅक्टरने पारे मोठे टाकण्याकरीता गेले असता त्यांना वनरक्षक रणजीत कुडावले यांनी अटकाव केला व जमीन वाहती करण्यासाठी, पारे मोठे करण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती २२ हजार रूपये वनरक्षकाने मान्य करून वनमजुर देवराव भोयर याच्या हस्ते मंगळवारी रांगी येथे लाच स्वीकारली.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक यशवंत राऊत, सहाय्यक फौजदार प्रमोद ढोरे, पोलीस हवालदार नथ्थू थोटे, राजेश पद्मगिरवार, श्रीनिवास संगोजी, किशोर ठाकूर, संदीप उडाण, तुळशीराम नवघरे यांनी ही कारवाई केली.