Top News

वनविभागाचा खबरीच निघाला बिबट्याच्या शिकारीचा सुत्रधार #Leopardhunting #hunting #Leopard

चंद्रपूर:- मागील काही दिवसांपूर्वी ब्रम्हपुरी तालुक्यात बिबट्याची शिकार झाली. या प्रकरणी भंडारा वनविभागाच्या चमुने तोरगाव येथून रंगनाथ मातेरे यास ताब्यात घेतले. अटकेतील आरोपीच्या बयाणावरून, वनविभागाचा खबरीच आणि वाघाच्या शिकार प्रकरणातील मुख्य सुत्रधार असलेले पुढे आले. दुहेरी भूमिका वठवणार्‍या आरोपी नंदकिशोर पिंपळे यास अखेर वनविभागाने बेड्या ठोकल्या.
आतापर्यंत या प्रकरणात 5 आरोपींना अटक करण्यात आली असून, सर्व आरोपींना 25 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती ब्रम्हपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे. रंगनाथ मातेरे, शिवराज फटिंग, कमलकांत कुथे, विजय वाढणकर, नंदकिशोर पिंपळे असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात असलेल्या तोरगाव येथून 4 ते 5 दिवस आधी बिबट्याच्या शिकार प्रकरणात रंगनाथ मातेरे या शेतकर्‍याला त्याच्या 3 साथीदारांसह अटक करण्यात आली होती.
मात्र, या आरोपींच्या चौकशीत नंदू पिंपळे या व्यक्तीचे नाव समोर आले. त्याने जादूटोणा करून पैसे मिळविण्यासाठी बिबट्याची शिकार करायला लावल्याची आरोपींनी कबुली दिली. धक्कादायक म्हणजे, नंदू पिंपळे यानेच नागपूर वनविभागाच्या अधिकार्‍यांना बिबट्याच्या अवयवाच्या तस्करीची माहिती दिली होती. या माहितीच्या आधारावर नागपूर आणि भंडारा वनविभागाने रंगनाथ मातेरे याला बिबट्याच्या 21 मिश्या, 13 नखे, 12 दात आणि 4 सुळ्यांसह अटक केली होती. पण, शिकारीचे घटनास्थळ चंद्रपूर जिल्ह्यात असल्याने चंद्रपूर वनविभागाला हे प्रकरण तपासासाठी दिले गेले. वनविभाागाच्या तपासात नंदू पिंपळे हाच शिकारीचा मुख्य सुत्रधार असल्याचा खुलासा झाला.
नंदू पिंपळे याने जिल्ह्यातील अनेक ग्रामस्थांना पैशाचे आमिष दाखवून वाघ-बिबट्यांची शिकार करायला लावल्याची आणि त्यानंतर नागपूर वनविभागाच्या मार्फत त्यांना पकडून देऊन दोन्हीकडून पैस लुटल्याची दाट शक्यता वन्यजीवप्रेमी व वनविभागाच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या एक ते दोन वर्षात वाघ आणि बिबट्यांच्या शिकारी आणि अवयव तस्करीच्या उघडकीस आलेल्या अनेक प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामस्थ पैशांच्या लोभामुळे शिकारीच्या प्रकरणात अडकले गेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची राज्याच्या वन्यजीव मंडळाचे सदस्य बंडू धोतरे यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने