एक नामांकन अपात्र
पोंभुर्णा:- पोंभूर्णा नगरपंचायतच्या अध्यक्षपदासाठी चार अर्ज दाखल करण्यात आले. भाजपा कडून एकाच उमेदवाराचे दोन अर्ज दाखल करण्यात आले. तर शिवसेनेकडूनही दोन अर्ज दाखल केले होते.
भाजपा कडून वार्ड नंबर ४ मधून निवडून आलेल्या सुलभा गुरूदास पिपरे यांनी दोन अर्ज दाखल केले होते.तर शिवसेने कडूनही नगराध्यक्ष पदासाठी दोन अर्ज दाखल करण्यात आले.वार्ड नंबर १६ मधून निवडून आलेल्या शिवसेनेच्या रामेश्वरी गणेश वासलवार यांनी अर्ज दाखल केला होता तर दुसरा अर्ज भाजपा कडून वार्ड नंबर ८ मधून निवडून आलेल्या व भाजपाकडून नगराध्यक्ष पदाच्या प्रमुख दावेदार असलेल्या नंदा ऋषी कोटरंगे यांनी ऐनवेळेवर नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून आपला नगराध्यक्ष पदाचा नामनिर्देशन अर्ज दाखल केला होता. मात्र शिवसेने कडून अर्ज दाखल केलेल्या भाजपाच्या नंदा ऋषी कोटरंगे यांचा अर्ज उमेदवार स्वतः अथवा त्यांचे प्राधिकृत प्रतिनिधी मार्फत नगरपंचायतच्या मुख्याधिकारीकडे दाखल केला नसल्याने नियम २००९ चे नियम ४(१) व ६ अन्वये फेटाळण्यात आला.
पोंभूर्णा नगरपंचायतच्या नगराध्यक्षांच्या पदासाठी भाजपाकडून सुलभा गुरूदास पिपरे व शिवसेनेकडून रामेश्वरी गणेश वासलवार यांच्यात थेट लढत होणार आहे. पोंभूर्णा नगरपंचायतीत भाजपाचे १० , शिवसेनेचे ४, वंचितचे २, कांग्रेस १ असे पक्षीय बलाबल आहे. पक्षीय बलाबल पाहता भाजपाच्या सुलभा गुरूदास पिपरे प्रमूख दावेदार असल्याने नगराध्यक्षाची माळ सुलभा पिपरे यांच्या गळ्यात पडणार असली तरी भाजपाच्या नंदा कोटरंगे यांनी केलेली बंडाळी पाहता सुलभा पिपरे ला नगराध्यक्ष बनण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.भाजपा नंदा कोटरंगे यांची नाराजी कशी दूर करतील याचेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नंदा कोटरंगे यांची नाराजी राहिल्यास व नंदा कोटरंगे यांनी भाजपातील आपल्या समर्थकांना घेऊन शिवसेनेला पाठींबा दिल्यास शिवसेनेचा नगराध्यक्ष बनण्याचीही चित्र पाहायला मिळणार आहे.
एकंदरीत माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा बालेकिल्ला असलेल्या व पोंभूर्ण्याच्या विकासाला चारचांद लावलेल्या व्हाईट हाऊसमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष बनेल की शिवसेनेचा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.